BJP Focus 144 loksabha Seats : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (loksabha Election) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा जिंकता आल्या नाहीत, अशा जागांवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपनं देशातील 144 लोकसभा जागांसाठी विशेष रणनीती तयार केली आहे. 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेत देखील या 144 जागांवर भाजपचा पराभव झाला होता. या जागा निवडून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, ते 144 लोकसभा मतदारसंघ कोणते? महाराष्ट्रातील कोणते मतदारसंघ जिकण्यावर भाजपनं रणनिती आखली आहे, याची सविस्तर माहिती पाहुयात...


144 जागा जिंकण्याची रणनीती काय?


लोकसभेच्या 144 जागा जिंकण्यासाठी भाजपने 40 मंत्र्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. त्याला क्लस्टर प्रभारी असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक मंत्र्याला लोकसभेच्या 2 ते 3 जागा देण्यात आल्या आहेत. मंत्र्यांना राज्यसभेच्या खासदारांसह त्यांच्या जबाबदारीच्या लोकसभा मतदारसंघात जावे लागते. मंत्र्यांची टीम भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि जातीय समीकरणाची एक ब्लू प्रिंट तयार करेल. मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराची चाचपणी  करण्याचे कामही संबंधीत मंत्र्यांना देण्यात आलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 40 जागांवर मोठ्या प्रचारसभा घेमार आहेत. उर्वरित 104 जागांवर अमित शाह आणि जेपी नड्डा सभा घेणार आहेत.


पाहुयात 144 जागांची सविस्तर माहिती 


उत्तर प्रदेशमधील  20 जागांवर लक्ष 


उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 20 जागा अशा आहेत की, तिथे 2019 मध्येही मोदी आणि योगी यांची जोडी असूनही त्या जागांवर भाजपचा पराभव झाला. यूपीमधील मैनपुरी, रायबरेली, गाझीपूर आणि आंबेडकरनगर या प्रमुख जागांचा त्यामध्ये समावेश आहे. 2022 मध्ये यूपी विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवल्यानंतर, 2024 मध्ये यूपीमधील सर्व 80 जागा जिंकण्यावर भाजपचे लक्ष आहे. 2019 मध्ये भाजप आघाडीने 64 जागा जिंकल्या होत्या.


बिहारमध्ये 13 जागांवर लक्ष 


2022 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपला मोठा धक्का दिला होता. नितीश यांनी भाजपसोबतची युती तोडून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले. 2019 मध्ये नितीश आणि भाजपच्या जोडीने 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. किशनगंज या एका जागेवर एनडीए आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता नितीश यांच्या जाण्यानंतर भागलपूर, बांका, गया, सीतामढी या जागांवरही पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. 2014 मध्ये भाजपने जिंकलेल्या या जागा आहेत. बिहारमध्येही 13 जागा जिंकण्यासाठी भाजपने विशेष रणनीती तयार केली आहे.


तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी 


दक्षिण भारतात कर्नाटकानंतर भाजपचा डोळा तेलंगणावर आहे. हैदराबाद महापालिका निवडणुकीनंतरच इथे भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 2019 च्या निवडणुकीत तेलंगणात भाजपने 17 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या. भाजपने यावेळी राज्यातील सर्व 17 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2019 मध्ये ममतांच्या बालेकिल्ला बंगालमध्ये भाजपने ज्या प्रकारे फोडाफोडी केवी, त्याचप्रमाणे यावेळी तेलंगणात भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे.


पश्चिम बंगालमध्ये 18 जागा जिंकण्याची तयारी


2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला होता. गेल्या दीड वर्षात 10 हून अधिक भाजपच्या तगड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामध्ये 7 आमदारांचाही समावेश आहे. 2019 मध्ये भाजपने बंगालमध्ये 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. यातील बहुतांश जागा उत्तर बंगालमधील आहेत.
भाजपने राज्यात अशा 18 जागा निवडल्या आहेत की, जिथे यावेळी पुन्हा तृणमूल आणि काँग्रेसचा पराभव होऊ शकतो. यामध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्या ब्रह्मपूर जागेचा देखील समावेश आहे.


तामिळनाडूत  भाजपचे 6 जागांवर लक्ष 


2019 मध्ये, तामिळनाडू हे एकमेव मोठे राज्य होते जिथे भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. इथे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या केंद्रीय मंत्र्याचाही पराभव झाला होता. भाजपने 2024 साठी रणनीती बदलली आहे. पक्षाने राज्यातील 6 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये कोईम्बतूर, कन्याकुमारी, रामनाथपुरम,  शिवगंगाई, थुथुकुडी आणि अंदमान निकोबार या जागांचा समावेश आहे. 


महाराष्ट्रात  24 जागांवर विशेष लक्ष 


2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवली होती. 48 जागांपैकी दोन्ही पक्षांनी 41 जागा जिंकल्या होत्या. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रा समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुन्हा भाजप आणि शिंदे गटाचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. त्यानंतर राज्यातील समीकरणे बदलली आहेत. 2024 मध्ये भाजपने महाराष्ट्रातील 24 जागा जिंकण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. 


महाराष्ट्रातील 24 जागांमध्ये हातकणंगले, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, शिर्डी, शिरुर, बारामती, मावळ, रायगड, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, ठाणे, पालघर, कल्याण, नाशिक, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, रामटेक, बुलढाणा या 24 जागांवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे.


ओडिशामध्ये 10 जागांवर विषेश लक्ष


ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे पहिले नेते होते. पटनायक यांच्या बिजू जनता दलाची जवळपास 23 वर्षांपासून ओडिशात सत्ता आहे. ओडिशात लोकसभेच्या 21 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपने इथे 8 जागा जिंकल्या होत्या. या 8 जागांशिवाय ओडिशातील 10 जागांवर भाजपचे लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत पुरी, ढेंकनाल आणि भद्रक या तीन जागा होत्या जिथे भाजप उमेदवारांचा 50,000 मतांनी पराभव झाला होता. पुरीमध्ये भाजपचे संबित पात्रा यांचा बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांच्याकडून 11 हजार  मतांनी पराभव झाला होता.


कर्नाटक, आसाम आणि पंजाबमध्ये प्रत्येकी चार जागांवर विशेष लक्ष 


कर्नाटक, आसाम आणि पंजाबमध्ये लोकसभेच्या प्रत्येकी चार जागा जिंकण्यावर भाजपनेल लक्ष केंद्रीत केलं आहे.  कर्नाटकातील बंगळुरू ग्रामीण, हसन, गुलबर्गा आणि मंड्या या जागांवरही भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पटियाला, गुरुदासपूर आणि आसाममधील नवगाव, कालिबोर, धुबरी, बारपेटा या जागाही जिंकण्याची तयारी भाजपनं केली आहे. याशिवाय झारखंडमध्येही भाजपचं विशेष लक्ष आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झारखंड हे पहिले राज्य होते, जिथे भाजपचा पराभव झाला होता.


या जागांवर भाजपने कधीही विजय मिळवला नाही


144 जागांमध्ये देशातील काही हॉट सीट्सचाही समावेश आहे. जिथे भाजपला कधीही विजय मिळवता आलेला नाही. यामध्ये उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि मैनपुरी, महाराष्ट्रातील बारामती, पश्चिम बंगालमधील यादवपूर, तेलंगणातील मेहबूबनगर आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा यांचा समावेश आहे.