नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतरही राजकीय सभा का सुरु आहेत असे प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर भाजपने अखेर पुढचे दोन दिवस आपले सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज (18 जून) यासंदर्भातली घोषणा केली. व्हर्चुअल रॅलीजसह भाजप आपले सर्व राजकीय कार्यक्रम दोन दिवसांसाठी पुढे ढकलत असल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं.


मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्त भाजपचे नेते वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हर्चुअल रॅलीज संबोधित करत आहेत. भारत-चीन सीमेवरची घटना 15-16 जूनच्या मध्यरात्री घडली. त्याच दिवशी संध्याकाळी जे पी नड्डा यांनी एका रॅलीला संबोधित केलं. शिवाय काल (17 जून) रात्री दहा वाजेपर्यंत ते उद्या (19 जून) होणाऱ्या आसामच्या रॅलीजच्या प्रसारातही व्यस्त होते. मात्र अखेर आज सकाळी या रॅलीज स्थगित करण्याचा निर्णय जाहीर झाला.





आजच जे पी नड्डा यांनी चीन सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वााहिली. "मातृभूमीचं रक्षण करताना आपल्या जवानांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान कायम स्मरणात राहील. देश सदैव त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञ राहिल," अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. त्याच ट्वीटमध्ये त्यांनी पुढे भारतीय जनता पक्ष आपले सर्व कार्यक्रम 2 दिवस पुढे ढकलत असल्याचंही जाहीर केलंय.



काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल सरकारला पाच प्रश्न विचारत हल्लाबोल केला होता. त्यात 20 जवानांच्या बलिदानानंतरही राजकीय सभा का सुरु आहेत, असाही प्रश्न होता. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आत्तापर्यंत भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्हर्चुअल रॅलीज संबोधित केल्या आहेत. अमित शाह यांनी पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा इथल्या रॅलीजला संबोधित केलं. तर राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र रॅलीला संबोधित केलं होतं.