अनंतनाग : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दील या दहशतवादी संघटनेच्या इम्रान नबी या अतिरेक्याला अटक केली आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमधून त्याला जेरबंद केलं. हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील होण्यासाठी इम्रान नबी काही दिवसांपूर्वीच घरातून पळाला होता.


एमएससी असलेल्या इम्रान नबीने आपल्या कुटुंबीयांना फोन करुन आपण दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती दिली होती. त्यानतंर त्याचा शोध सुरु होता. इम्रान कोणत्या तरी चकमकीत जखमी झाला होता आणि उपचारांसाठी जंगलटमंडी रुग्णालयात दाखल झाला होता. तिथे सुरक्षा दलाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि काही गोळ्याही जप्त करण्यात आल्या.


इम्रान नबीची घरातून का आणि कसा पळून गेला आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कसा आला याची आता चौकशी केली जाणार आहे.


मागील काही दिवसात सुरक्षादलाने 27 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे, त्यामुळे हताश झाल्याने दहशतवाद्यांनी आता निरपराधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सिंह म्हणाले की, "काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही मागील 16 ते 17 दिवसात 27 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन संबंधित आहेत. आता हताश होऊन आता त्यांना निरपराध लोकांना लक्ष्य करत आहेत."