BJP State President News: लोकसभेच्या निवडणुकांच्या (Loksabha Election) आधी अनेक राज्यांमध्ये विधानसेभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सध्या याचीच तयारी सर्व राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) चार राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माजी केंद्रीय मंत्री दग्गुबती पुरंदेश्वरी यांना आंध्र प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांची झारखंड प्रदेशाध्यक्षपदी आणि सुनील जाखड यांची पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दग्गुबती पुरंदेश्वरी आणि सुनील जाखड यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता.
तर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधून भाजपात आलेले किरण कुमार रेड्डी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवण्यात आले आहे. त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. भाजपकडून जारी करण्यात आलेल्या या नियुक्त्यांच्या पत्रांमध्ये म्हटले आहे की, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी या नियुक्त्यांना सहमती दर्शवली आहे आणि तात्काळ त्यांना अमलात आणण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (3 जुलै) रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील उपस्थित होते. या नेत्यांनी 28 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर भाजपमध्ये आता हे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
किशन रेड्डी यांच्याकडे तेलंगणाची जबाबदारी
किशन रेड्डी हे सध्या तेलंगणाचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांनी 2019 मध्ये सिकंदराबाद मतदारसंघातून निवडून आले होते. रेड्डी यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाच्या कारकिर्दीला 1977 पासून भाजपचा युवा नेता म्हणून सुरुवात केली होती. किशन रेड्डी यांच्याकडे पहिल्यांदाच तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यांना 2019 मध्ये केंद्र सरकरामध्ये मंत्री पद देखील देण्यात आले होते. त्यांची तेलंगणाचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय बंदी यांच्या जागी निवड करण्यात आली आहे.
सुनील जाखड यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश
सुनील जाखड यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांना पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. जाखड हे पहिल्यांदा 2002 मध्ये पंजाबमधील अबोहरमधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी 2007 आणि 2012 मध्ये पुन्हा अबोहरमधून निवडणूक जिंकली होती. त्यांनी गुरुदासपूरमधील पोटनिवडणूक जिंकून खासदारकी मिळवली होती. तसेच ते 2012-2017 पर्यंत पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.त्यांना काँग्रेसच्या हायकमांडकडून नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी 14 मे 2022 काँग्रेस पक्षाला रामराम केला.
बाबूलाल मरांडी यांच्याकडे झारखंडची जबाबदारी
बाबूलाल मरांडी हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे आता झारखंडच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडण्यात आले आहे. सध्या ते झारखंड विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी 1998 ते 2000 या काळात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर 2000 मध्ये झारखंड राज्यात एनडीएची सत्ता आली आणि मरांडी झारखंडचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये भाजपचा हात सोडून स्वत:चा झारखंड विकास मोर्चा नावाचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाला भाजपमध्ये सामील करत पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.
माजी केंद्रीय मंत्री दग्गुबती पुरंदेश्वरी यांच्याकडे आंध्र प्रदेशची जबाबदारी
दग्गुबत्ती पुरंदेश्वरी यांनी 2009 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि 2012 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. पंरतु त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. भाजपने त्यांची महिला मोर्चाच्या प्रभारीपदी देखील नियुक्ती केली होती. त्या
2020 पासून ओडिशा राज्यात भाजपच्या राज्य प्रभारी आहेत. त्यांच्याकडे आता आंध्र प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.