नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आरपीएन सिंग आणि सुधांशू त्रिवेदी यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पक्षाने बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील जागांसाठी मात्र अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. 


भाजपने सुभाष बराला यांना हरियाणातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तर भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांना उत्तराखंडमधून राज्यसभेच्या उमेदवारीची संधी दिली आहे. पक्षाने बिहार भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा धरमशीला गुप्ता यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे आणि नितीश कुमार यांचे माजी सहकारी भीम सिंह यांनाही संधी दिली आहे.


या नेत्यांना संधी मिळाली


कर्नाटकातून नारायण कृष्णसा भांडगे, छत्तीसगडमधून राजा देवेंद्र प्रताप सिंह आणि पश्चिम बंगालमधून सामानी भट्टाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत आणि नवीन जैन यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


 






या नेत्यांची तिकिटे कापली


हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना उमेदवारी दिली नाही. याशिवाय पक्षाने एकाही केंद्रीय मंत्र्याला राज्यसभेचे तिकीट दिलेले नाही. त्याचवेळी जीतन राम मांझी यांचे तिकीटही रद्द करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि उत्तराखंडचे खासदार अनिल बलुनी यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. ज्या केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यांचे नाव यादीत नाही. मात्र पक्षाने अद्यापही अनेक उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.


27 फेब्रुवारी रोजी मतदान


27 फेब्रुवारी रोजी देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी (8 फेब्रुवारी) याबाबत अधिसूचना जारी केली होती. राज्यसभेसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येतील.


टीएमसीने उमेदवारही जाहीर केले


यापूर्वी तृणमूल काँग्रेसने (TMC) राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 4 उमेदवारांची घोषणा केली होती. पक्षाने माटुआ समाजातील पत्रकार सागरिका घोष, नदीमुल हक, सुष्मिता देव आणि ममता बाला ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.


यंदा राज्यसभेचे 68 सदस्य निवृत्त होणार आहेत. यापैकी 3 खासदारांचा कार्यकाळ 27 जानेवारीला पूर्ण झाला आहे, तर आणखी 65 सदस्य निवृत्त व्हायचे आहेत. या 65 सदस्यांपैकी 56 सदस्य 23 फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. त्याचबरोबर राज्यसभेच्या 7 खासदारांचा कार्यकाळ २ ते ३ एप्रिल दरम्यान पूर्ण होणार असून 2 सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत.


भाजपचे 32 खासदार निवृत्त होत आहेत


निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत. यंदा भाजपच्या 32 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यानंतर काँग्रेसचे 11 खासदार निवृत्त होणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे ४ आणि बीआरएसच्या ३ खासदारांचा समावेश आहे. याशिवाय जेडीयू, बीजेडी आणि आरजेडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त होत आहेत. एनसीपी, सपा, शिवसेना, टीडीपी, वायएसआरसीपी, एसडीएफ, सीपीआय, सीपीआयएम आणि केरळ काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार या वर्षी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.


ही बातमी वाचा: