Swiggy In 2023: भारतात मिळणारी बिर्याणी (Biryani) ही जगात प्रसिद्ध आहे. भारतीय पदार्थांमध्ये बिर्याणीला दरवर्षी सर्वाधिक मागणी असते, यंदाही हे सिद्ध झालं आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीवर 4.3 लाख बिर्याणी ऑर्डर करण्यात आली होती, तर 83 हजार नूडल्सची ऑर्डर देण्यात आली होती.


बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर


स्विगीच्या मते, बिर्याणी ही सलग आठव्या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश आहे. 2023 मध्ये प्रत्येक सेकंदाला 2.5 बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली, त्यापैकी प्रत्येक 5.5 चिकन बिर्याणीमागे एक व्हेज बिर्याणीची ऑर्डर होती. बिर्याणीची ऑर्डर करणारे 24.9 लाख लोक स्विगी प्रथमच वापरणारे होते.


भारत-पाक सामन्यादरम्यान दर मिनिटाला 250 बिर्याणी ऑर्डर


हैदराबादमधील एका व्यक्तीने 2023 मध्ये एकूण 1,633 बिर्याणी ऑर्डर केल्या. भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यादरम्यान चंदीगडमधील एका कुटुंबाने 70 प्लेट बिर्याणीची ऑर्डर दिली. या सामन्यादरम्यान, स्विगीला दर मिनिटाला 250 बिर्याणीची ऑर्डर मिळाली. 


वर्ल्डकप फायनलला दर मिनिटाला 188 पिझ्झा ऑर्डर


19 नोव्हेंबर 2023 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम वर्ल्ड कप सामन्याच्या दिवशी देशात दर मिनिटाला स्विगीवर 188 पिझ्झाची ऑर्डर देण्यात येत होती. स्विगीने 2023 मध्ये आपल्या अ‍ॅपवर वापरकर्त्यांद्वारे ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थाच्या ट्रेंडशी संबंधित डेटा जारी केला आहे, ज्यामुळे ही माहिती समोर आली आहे.


मुंबईतील एका व्यक्तीने मोडला ऑनलाईन ऑर्डरचा रेकॉर्ड 


मुंबईतल्या एका व्यक्तीने वर्षभरात स्विगीवरुन 42.3 लाख रुपयांचं जेवण ऑर्डर केलं. स्विगीला बहुतांश ऑर्डर या चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादमधून येतात. ऑनलाइन फूड ऑर्डर मध्ये छोटी शहरंही मागे नाहीत. झाशीमध्ये एकाच वेळी एकूण 269 खाद्यपदार्थांच्या ऑर्डर आल्या होत्या. भुवनेश्वरमध्ये एका घरातून एकाच दिवसात 207 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली होती आणि तेव्हा त्या घरात पिझ्झा पार्टी देखील नव्हती.


रसगुल्ला नव्हे, तर गुलाबजाम ही सर्वात पसंतीची स्वीट डिश


भारतीयांना आता रसगुल्ल्यापेक्षा गुलाबजाम अधिक आवडतो. दुर्गापूजेदरम्यान गुलाबजामच्या 77 लाख ऑर्डर देण्यात आल्या होत्या. गुलाबजाम व्यतिरिक्त नवरात्रीत नऊ दिवसांसाठी मसाला डोसा ही सर्वात आवडती व्हेज ऑर्डर होती. हैदराबादमधील एका व्यक्तीने 2023 मध्ये इडलीच्या ऑर्डरवर 6 लाख रुपये खर्च केले.


बंगळुरू बनलं केक कॅपिटल


बंगळुरूमध्ये 2023 मध्ये 85 लाख चॉकलेट केकची ऑर्डर देण्यात आली होती, त्यानंतर याला 'केक कॅपिटल' ही पदवी मिळाली. 2023 मध्ये व्हॅलेंटाईन डे, म्हणजेच 14 फेब्रुवारीला दर मिनिटाला 271 केकची ऑर्डर देण्यात आली. नागपुरातील एका व्यक्तीने एकाच दिवसात 72 केक मागवले.


हेही वाचा:


Winter Foods : थंडीत आवडीने खाल्ले जातात 'हे' 5 स्ट्रीट फूड; यातील तुमचा आवडता पदार्थ कोणता?