Winter Street Foods : हिवाळ्याचा महिना सुरू झाला आहे आणि आता थोडी थोडी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. हिवाळा (Winter) म्हटलं की चमचमीत पदार्थ खाण्याचा आनंद द्विगुणित होतो. थंडीत गरमागरम चहासोबत खुसखुशीत स्नॅक्स खाण्यात वेगळाच आनंद असतो. फक्त चहाप्रेमीच नाही, तर अनेक खवय्ये देखील थंडीत विविध खाद्यपदार्थ खाण्याचे शौकिन असतात. या काळात अनेकजण स्ट्रीट फूडवर अधिक भर देतात. 


बाहेर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची चवच इतकी भारी असते की, आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. विशेष म्हणजे काही रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद हा फक्त थंडीच्या मोसमात घेतला जातो. हिवाळ्यात काही खाद्यपदार्थ मोठ्या उत्साहाने खाल्ले जातात, या पदार्थांवर एक नजर मारुया, यातील अनेक पदार्थ हे तुमच्याही आवडीचे असतील.


गाजरचा हलवा (Gajar Halwa)


जर आपण हिवाळ्यात खाल्ल्या जाणार्‍या पदार्थांबद्दल बोललो तर, गाजर हलव्याला विसरुन कसं चालेल? फक्त घरातच नाही, तर भारताच्या जवळपास प्रत्येक गल्लीत किंवा कोपऱ्यात गाजरचा हलवा विकणारे दिसतात. थंडीच्या मोसमात तुम्हाला अनेक लोक गाजराचा हलवा खाण्याचा आनंद घेताना दिसतील. देशी तूप आणि गाजरापासून बनवलेल्या या गोड पदार्थाचं अनेकांना वेड आहे.




पाया सूप (Paaya Soup)


हिवाळ्यातील ही एक लोकप्रिय डिश आहे, जी शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते. मुंबईत मटणाचं पाया सूप सर्वाधिक प्रमाणात प्यायलं जातं, तर दिल्लीचे लोक पारंपारिक पद्धतीने शेळी, मेंढ्या किंवा इतर प्राण्यांच्या पायापासून सूप बनवतात आणि ते मोठ्या आवडीने पितात. हे आरोग्यासाठीही उत्तम आहे आणि त्याची चवही अप्रतिम आहे.




पाणीपुरी (Panipuri)


थंडीच्या मोसमात गरमागरम पाणीपुरी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. पाणीपुरी तोंडात टाकल्यावर फुटते आणि तिचा जो स्वाद असतो, तो शब्दातही सांगता येणार नाही. संपूर्ण भारतात विविध नावाने हा पदार्थ प्रचलित आहे आणि सर्वांच्या आवडीचा आहे.




छोले भटुरे (Chole Bhature)


थंडीच्या दिवसांत अनेकजण छोले भटुरे खाण्याला पसंती दर्शवतात. अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्वजण हा पदार्थ आवडीने चाखतात. दिल्ली आणि छोले भटुरे यांच्यात तर एक अतुट नातं आहे. दरवर्षी राजधानीत कडाक्याची थंडी पडली की, शेकडो लोक स्वतःला उबदार ठेवण्यासाठी त्यांच्या आवडत्या मसालेदार छोले आणि तळलेल्या पुरीचा मनसोक्त आनंद घेतात.




मसाला दूध (Masala Milk)


थंडीत भुरके मारत गरमागरम मसाला दूध पिण्याची मजाच काही और आहे. दुधासोबत पोटात जाणारा सुकामेवा आणि अलगद पसरलेला केशराचा सुवास म्हणजे वाह... थंडीची मजा वाढवण्यासाठी अनेकजण मसाला दूध पिण्याला पसंती दर्शवतात. थंडी वाढू लागली की मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे. औरंगाबाद, पुणे आणि इतरही काही शहरांमध्ये थंडीच्या दिवसांत अगदी चौकाचौकात गरमागरम मसाला दूध बनवणारे ठेले दिसू लागतात. 



हेही वाचा:


Lonavala Restaurants : फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? 'ही' 5 ठिकाणं नक्की ट्राय करा