नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज 86 वा वाढदिवस. मनमोहन सिंह हे आज 87 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.  मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मनमोहन सिंह यांना शुभेच्छा दिल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, मनमोहन सिंह यांना दीर्घायुष्य लाभो अशी कामना केली.  तर राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन मनमोहन सिंह यांना शुभेच्छा दिल्या.


"मनमोहन सिंहजींचा वाढदिवस म्हणजे त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि देशासाठी वाहून घेऊन केलेल्या कामाचं कौतुक करण्याची आमच्यासाठी एक संधी आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळो अशा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.


मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. मनमोहन सिंह हे 2004 ते 2014 या दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते.

आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मनमोहन सिंह हे आपल्या मौनामुळे चर्चेत राहिले. मात्र अबोल राहून बोलकं काम करणं हीच त्यांची खासियत होती. अचाट बुद्धीमत्तेमुळे भारताच्या ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला कमी कालावधीत ट्रॅकवर आणणारा माणूस म्हणजे मनमोहन सिंह होय.

छोट्याशा गावात जन्म

मनमोहन सिंह यांचा जन्म पंजाब प्रांतातील गाह या गावात झाला. सध्या हा भाग पाकिस्तानात आहे.

मनमोहन सिंह यांचं शिक्षण

  • लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या मनमोहन सिंह यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक पदव्या आपल्या नावावर केल्या.

  • पंजाब विद्यापीठातून बीएची पदवी

  • 1954 मध्ये अर्थशास्त्रात एमएम

  • पीएचडीसाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश, तिथे राइट्स पुरस्काराने सन्मान

  • ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या नेफिल्ड कॉलेजमधून डी.फिल परीक्षा उत्तीर्ण

  • चंदीगड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती

  • दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही शिक्षक म्हणून काम पाहिलं

  • जगातील कुशल अर्थशास्त्र म्हणून ओळख


नोटाबंदीबाबत मनमोहन सिंह यांचा अंदाज

नोटाबंदीच्या चर्चेदरम्यान नोव्हेंबर 2016 मध्ये मनमोहन सिंह यांनी राज्यसभेत आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी त्यांनी नोटाबंदी ही भारतीय अर्थव्यवस्थेला धोका ठरु शकते असं सांगत, ती एक संघटीत लूट असल्याचं म्हटलं होतं. शिवाय जीडीपीमध्येही दोन टक्के घट होईल असा अंदाज वर्तवला होता.

मनमोहन सिंह हे 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार म्हणून भारत सरकारच्या सेवेत दाखल झाले. मग पुढच्याच वर्षी 1972 मध्ये त्यांची अर्थमंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती झाली.

मनमोहन सिंह यांनी भूषविलेली पदं

अर्थसचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान अशी पदं मनमोहन सिंह यांनी भूषवली आहेत.

मनमोहन सिंह यांचे मोठे निर्णय

1) जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण

मनमोहन सिंह यांना आर्थिक सुधारणांचे जनक म्हटलं जातं. 1991 मध्ये देशात नरसिंहराव यांचं सरकार होतं, त्यावेळी मनमोहन सिंह हे अर्थमंत्री होते. मनमोहन सिंह यांनी त्या वर्षीच जागतिकीकरणाचा निर्णय घेत, भारतासाठी जागतिक बाजारपेठ खुली केली.

2) रोजगार हमी योजना
बेरोजगारी हे भारतातील सर्वात मोठं संकट. मात्र मनमोहन सिंह यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर नेत मनरेगा म्हणून लागू केली. या अंतर्गत 100 दिवसांचा रोजगार आणि किमान 100 रुपये दिवसाची मजुरी निश्चित करण्यात आली. 2 ऑक्टोबर 2009 रोजी या योजनेचं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा असं नामकरण करण्यात आलं.

या योजनेची आणखी एक खास बाब म्हणजे यामध्ये स्त्री-पुरुष सर्वांना समान वेतन आहे, कोणताही भेदभाव नाही.

3) आधार कार्ड
सध्या मोदी सरकार सगळीकडे ज्या आधार कार्डचा उल्लेख करत आहे, ती देण मनमोहन सिंह सरकारची आहे. मनमोहन सिंहांच्या आधार योजनेचं कौतुक संयुक्त राष्ट्र अर्थात यूएन ने केलं होतं. आधार ही भारतातील सर्वोत्तम योजना असल्याचं यूएनने म्हटलं होतं.

4) भारत-अमेरिका न्यूक्लियर करार
यूपीए सरकार सत्तेत आल्यानंतर 2005 मध्ये भारत-अमेरिका अणूकरार करण्यात आला. प्रचंड दबावातही मनमोहन सिंह कोणासमोरही न झुकता, त्यांनी या कराराला प्रत्यक्षरुप दिलं. यामुळे न्यूक्लियर हत्यांरांबाबत एक शक्तिशाली देश म्हणून भारताची जगात ओळख झाली. त्यावेळी जॉर्ज बुश हे अमेरिकेचे अध्यक्ष होते.

5) शिक्षणाचा अधिकार
मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातच ‘राईट टू एज्युकेशन’ अर्थात शिक्षणाचा अधिकाराचा कायदा अस्तित्त्वात आला. याअंतर्गत 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला.