Ravidas jayanti 2022 : 14 फेब्रुवारीला पंजाबची (punjab election 2022) निवडणूक होणार होती. पण ती रद्द करण्यात आली. याचं कारण होतं आज 16 तारखेला असणारी संत रविदास यांची जयंती. 14 फेब्रुवारीला होणारी निवडणूक रद्द करून 20 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागला. एका जयंतीच्या तारखेवरून संपूर्ण निवडणूक पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. यावरूनच पंजाबच्या राजकारणात रवीदासिया समुदायाचं किती महत्व आहे, हे आपल्याला दिसून येतं. रविदासिया समाजाचं एवढं महत्व का आहे. रविदासिया समाज नेमका आहे तरी काय हे जाणून घेऊया.
संत रविदास.. पंधराव्या शतकातलं पंजाबमधल्या संत परंपरेतलं एक नाव. रविदासांनी ज्या विचारांचा प्रसार केला. त्याला मानणारा समाज आज रविदासिया समाज म्हणून ओळखला जातो. या पंथाला मानल्या जाणाऱ्या समुदायाची संख्या पंजाबमध्ये 50 लाखांपेक्षा अधिक आहे. संत रविदास यांची जयंती 16 फेब्रुवारीला वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. त्यासाठी रविदासिया समाजातले मतदार वाराणसीला जातात. 10 फेब्रुवारीपासून 17 तारखेपर्यंत 80 टक्के रविदासिया समाज वाराणसीमध्ये असतो. याचा थेट परिणाम मतदानावर होणार असल्यानं निवडणूक आयोगानं निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
डेरा सचखंड बल्लान हे पंजाबमधलं रविदासिया संप्रदायाचं सर्वात मोठं केंद्र. या रविदासिया संप्रदायाचे बहुतांश सदस्य अनुसुचित जातीचे आहेत. 2009 साली ऑस्ट्रियाची राजधानी विएन्नामध्ये तत्कालिन रविदासिया संप्रदायाचे गुरू संत निरंजन दास आणि नायब संत रामानंद दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. असं म्हणतात की हल्ला करणारे दहशतवादी हे शिख धर्मिय होते. त्यामुळे रविदासिया संप्रदायानं शिखांपासून फारकत घेतली. इथूनच रविदासिया संप्रदायाला स्वतंत्र ओळख मिळाली.
व्हिएन्नामध्ये झालेल्या हत्येनंतर रविदासिया संप्रदाय वेगळा झाला. शिखांचा पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबच्या ऐवजी रविदासांची अमृत वाणी हा रविदासिया समुदायाचा ग्रंथ बनला.
पंजाबमध्ये 6 महत्वाचे डेरे आहेत. त्यापैकी रविदास समुदायाचा डेरा आहे, जालंधर मधला डेरा सच्चा बल्ला. नेत्यांची नजर खूप बारिक असते. त्यांना या डेर्यांमध्ये येणार्या भाविकांच्या संख्येत आपली मतं दिसतात.
पंजाब हा माझा, मालवा आणि दोआबा अशा तीन प्रांतात विभागलाय. दोआबा प्रांतात 45% लोकसंख्या दलितांची आहे. यातल्या 61% लोक रविदासिया समुदायाचे आहेत. पंजाबच्या 117 जागांपैकी 23 जागा दोआबा प्रांतात येतात. त्यापैकी 19 जागांवर रविदासिया समुदायाच्या मतांचा प्रभाव पडतो.
रविदासिया समुदायाच्या व्यतिरिक्त इतर समुदायाचे अनेक लोक संत रविदास यांना मानतात. म्हणूनच चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री झाल्यावर डेरामध्ये आले होते. 101 एकर जागेमध्ये संत रविदासांचे विचार जपणाऱ्या केंद्राची घोषणा केली. इतकच नाही तर मु़ख्यमंत्री झाल्यावर ते या डेर्यामध्ये रात्रभर जमिनीवर झोपले होते. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे याच रविदासिया समुदायातून येतात.
पण आता या डेऱ्यांनाही मतांचं राजकारण कळायला लागलंय. त्यामुळे कुठलाही डेरा थेट कोणत्याही पक्षाला समर्थन देण्याचं टाळतो.
जाति जाति में जाति है, जो केतन के पात।
रैदास मनुष ना जुड़ सके, जब तक जाति ना जात।।
जोपर्यंत जात ही जात नाही तोपर्यंत माणूस माणसाशी जोडला जाणार नाही. संत रविदासांचं हे म्हणणं या समुदायाला वेळीच कळलं तर उमेदवाराची जात नव्हे, तर काम बघून मत दिलं जाईल.