Bird flu बर्ड फ्लू हे आणखी एक नाव आणि या निमित्तानं आणखी एक मोठं संकट सध्या देशावर आल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये या संकटाचं सावट अधिक गडद होत असतानाच काही राज्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रात मात्र अद्यापही अशा संसर्गाचं निरिक्षण नसल्यामुळं तूर्तास बर्ड फ्लूचा धोका नसल्याचं स्पष्ट होत आहे.
सावधगिरी म्हणून हिमाचल प्रदेशात अंडी आणि चिकनच्या विक्रीवर बंदी घालण्अयात आली आहे. ज्यामुळं आता सर्वत्रच चिकन आणि अंडी खरेदी करण्यापूर्वी अनेकांच्याच मनात संभ्रम आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
All India Institute Of Medical Sciences अर्थात एम्स (AIIMS) च्या माहितीनुसार पोल्ट्री उत्पादनांची खरेदी आणि त्यांचं सेवन हे पूर्वीप्रमाणंच सुरु ठेवण्यास हरक नाही. या गोष्टींच्या खरेदी किंवा सेवनावेळी संसर्गाची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. पण, त्या वापरात आणण्यापूर्वी चांगल्या पद्धतीनं स्वच्छ करुन आणि पूर्णपणे शिजवूनच खाव्यात ही बाबही अधोरेखित करण्यात आली.
avian flu virus हा जवळपास 30 मिनिटांसाठी 70 अंश सेल्शिअसच्या तापनामात राहिल्यात विनाश पावतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अंडी आणि अन्य पोल्ट्री उत्पादनं हाताळल्यानंतर हात आणि संपर्कात आलेले सर्व अवयव, वस्तू साबण आणि पाण्यानं धुवून स्वच्छ करा. 'सनी साईड अप', किंवा 'रनी योल्क्स' असणारा अंड्याच्या प्रकार खाण्याला अनेक खवैय्यांचं प्राधान्य असतं. पण, तूर्तास ही आवड दूर सारच अंड्यांचा सफेद आणि पिवळा भाग पूर्णपणे शिजवून त्यानंतरच त्याचं सेवन करावं असा सल्लाही देण्यात आला आहे.