IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांचे जावई आयपीएस शिवदीप लांडे यांचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयजी शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनातून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 19 वर्षे देशाची सेवा केली.
वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची चर्चा
शिवदीप लांडे यांनी चार महिन्यांपूर्वी राजीनामा पत्र पाठवले असून ते निवृत्तीच्या प्रतीक्षेत होते. बिहारचे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. परतु, राजीनामा फेटाळण्यात आल्याने प्रक्रियेला विलंब होत असल्याची चर्चा होती. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, बिहारच्या या बड्या आयपीएसने अचानक राजीनामा दिल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या.
तीन तरुण अधिकाऱ्यांचे नोकरीवर तुळशीपत्र
दुसरीकडे, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत खूप मेहनत केल्यानंतर यश मिळते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची आयएएस आणि आयपीएस सारख्या पदांसाठी निवड केली जाते, परंतु वर्षानुवर्षे पोलिसांचा गणवेश परिधान करून सरकारी नोकरी करणाऱ्या अनेक आयपीएस अधिकाऱ्यांचा या नोकरीचा भ्रमनिरास झाला आहे. विशेष म्हणजे बिहारमधून तीन तरुण अधिकाऱ्यांनी कारकिर्द बहरात असताना नोकरीवर तुळशीपत्र ठेवले आहे.
जाणून घेऊया या तीन आयपीएस अधिकाऱ्यांची कहाणी
शिवदीप लांडे आयपीएस पदाचा राजीनामा देताना पूर्णिया रेंजचे आयजी होते. नंतर पटना येथे आयजी ट्रेनिंगच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेही यासंदर्भात अधिसूचना जारी केली. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण अकोला येथील सरस्वती विद्या मंदिरात झाले. त्यानंतर त्यांनी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. शिवदीप लांडे यांनी 2005 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ते बिहार केडरचे IPS झाले.
आयपीएस काम्या मिश्रा यांनीही राजीनामा दिला
शिवदीप लांडे यांच्यापूर्वी बिहार केडरच्या आणखी एका आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा (Kamya Mishra) यांनीही राजीनामा दिला होता, त्यानंतर त्याही चर्चेत राहिल्या. काम्या मिश्रा या 2019 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी होत्या. यूपीएससी परीक्षेत त्यांची हिमाचल प्रदेश केडरसाठी निवड झाली. नंतर 2021 मध्ये त्यांची बिहार केडरमध्ये बदली झाली. राजीनामा दिल्यावर त्यांना दरभंगा ग्रामीणचे एसपी म्हणून नियुक्त केले होते. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्या आयपीएस झाल्या. नागरी सेवा परीक्षेत त्यांचा क्रमांक 172 वा होता. काम्या मिश्रा यांनी केवळ 5 वर्षे पोलीस सेवेत काम केले. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी ऑगस्ट 2024 मध्ये राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय बाकी असताना गृह विभागाने त्यांना 180 दिवसांची रजा मंजूर केली आहे.
आयपीएस आनंद मिश्रांनी सुद्धा नोकरी सोडली
2024 मध्येच बिहारमधील आयपीएस आनंद मिश्रा (Anand Mishra)यांनीही राजीनामा दिला होता. मिश्रा यांनी जीवनाचे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी आयपीएसची नोकरी सोडल्याचे सांगितले होते. त्यांनी बक्सर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मूळचे बक्सर, बिहारचे असलेले आयपीएस आनंद मिश्रा यांनी 2011 मध्ये वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्याने 225 वा क्रमांक मिळवला होता. त्यांना मणिपूर केडर मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या