बेळगाव : सध्याची परिस्थिती पाहिली तर सीमा प्रश्नाच्या बाबत महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका उपस्थित होते. एक डिसेंबरपासून सीमाप्रश्न सुटण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवून एक वर्षाच्या आत सीमाप्रश्न सोडवून घेऊया, असा निर्धार माजी आमदार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी व्यक्त केला. मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या काळया दिनाच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर आणि अन्य नेते मंडळी उपस्थित होती.
मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करण्याची तयारी ठेवा
आपला प्रश्न आम्हीच सोडवून घ्यायचा आहे. महाराष्ट्रतील निवडणूक झाल्यावर सत्तेत आलेल्या सरकारकडे पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या दाव्याला गती देऊ. प्रसंगी वर्षा बंगल्या सामोरे आम्ही आंदोलन करू. मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करण्याची तयारी ठेवा. सीमाभागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकार अन्याय करते आणि महाराष्ट्र सरकार त्या बाबत आक्षेप घेत नाही अशी खंतही मनोहर किणेकर यांनी व्यक्त केली.
मराठी भाषिकांनी मराठी बाण्याचे दर्शन घडवले
मराठी भाषिकांनी काळा दिन पाळून मूक सायकल फेरी काढून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त केला. पोलिसांनी आणि प्रशासनाने फेरीला परवानगी नाकारली होती तरीही मराठी भाषिकांनी फेरी काढून मराठी बाण्याचे दर्शन घडवले. परवानगी नसताना फेरी काढली म्हणून पोलिसांनी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. आजच्या फेरीत चौथी पिढी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
युक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला प्रारंभ झाला. दंडावर काळया फिती बांधून मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते. 1956 साली भाषावार प्रांत रचना झाल्यावर बेळगाव आणि सीमाभाग मराठी भाषिक सत्तर टक्क्यांहून अधिक असून देखील अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला.तेव्हापासून गेली 68 वर्षे मराठी भाषिक एक नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून आपला महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त करतात. शहरातील प्रमुख मार्गावर फिरून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता झाली.
बेळगाव, कारवार, निपाणी,बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे अशा घोषणा देत हजारो मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते. फेरीत सहभागी झालेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती. फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हातात धरलेले बॅनर आणि फलक लक्षवेधी ठरले होते. फेरीच्या मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या