Satej Patil Vs Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून ते आज विधानसभा निवडणुकीपर्यंत करवीरनगरी अर्थात कोल्हापूर राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कोल्हापूरच्या मातीतून जो संदेश दिला जातो तो राज्यभर पोहोचतो, असे म्हटले जाते. त्यामुळे राजकारणाचा आणि समाजकारणाचा केंद्रबिंदू कोल्हापूर होऊन गेलं आहे. राजकारण एका बाजूने होत असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूरमध्ये ज्या काही जातीय किंवा धार्मिक घटना घडल्या, त्यानंतर जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सद्भावना रॅली सुद्धा काढण्यात आली. विशाळगड दंगलीने सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याला दंगलीचा एका वर्षात दुसऱ्यांदा डाग लागला. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने कोल्हापूर नेहमीच टार्गेटवर होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
या सर्व घडामोडी घडत असतानाच कोल्हापूर लोकसभेला सुद्धा थेट शाहू महाराज रिंगणात उतरल्याने बरीच चर्चा झाली. शाहू महाराज यांचा राजकारणातील प्रवेश, कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसकडे घेणे या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील अग्रभागी होती. शाहू महाराज रिंगणात असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सन्मानाने जागा महाराजांसाठी देऊ केली. त्यांनी राजवाड्यावर जात महाराजांना शुभेच्छा दिल्या होत्या. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि भाजपकडून मान गादीला आणि मत मोदींना असा प्रचार करून छत्रपती घराण्याला आणि सतेज पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सतेज पाटील यांनी शाहू महाराजांसाठी पायाला भिंगरी लावत विजय खेचून आणला. मात्र, या सर्व घडामोडीत सातत्याने सतेज पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुद्धा वाढल्याचे दिसून येत आहे. आताही कोल्हापूर उत्तरच्या निमित्ताने छत्रपती घराणं निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि सतेज पाटील सुद्धा आहेत. विरोधातही पुन्हा एकदा शिंदे ठाकले आहेत.
कोल्हापूर लोकसभेपासून सतेज पाटील आणि शिंदेंचा कलगीतुरा
एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावल्यानंतर कोल्हापुरातील एकमेव विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, 2019 मध्ये ठाकरेंना पाठिंबा दिल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदे यांना साथ दिली. कोल्हापूरचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनीही शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. लोकसभेला संजय मंडलिक हातकणंगलेमधून धैर्यशील माने होते. त्यामुळे प्रचारामध्ये सातत्याने एकनाथ शिंदे आणि सतेज पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसून आलं. संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना एकनाथ शिंदे यांनी सतेज पाटलांना त्यांच्या टोपण नावावरून दिवचण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत एका महिन्यात चारवेळा कोल्हापूर दौरा केला होता. मोदी यांची सभाही कोल्हापुरातील तपोवन मैदानात घेण्यात आली. या सभेच्या तयारीसाठी शिंदे आदल्यादिवशीच कोल्हापुरात आले होते. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरची जागा जिंकण्याचा उद्देश शिंदे यांचा होता. तर कोणत्याही परिस्थितीत पुरोगामी संदेश देण्यासाठी आणि कोल्हापूर अभेद्य आहे हे सांगण्यासाठी सतेज पाटील यांची यंत्रणा कार्यरत होती.
बंटींची आता वाजवायची घंटी, शिंदेंची टीका
शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी जाहीरपणे एकदा सतेज पाटील यांची राजकारणात कळ काढल्यास खैर नसल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले होते. मात्र, राजेश क्षीरसागर आणि शिंदे यांनी नेहमीच सतेज पाटील यांना टीकेतून उत्तर दिलं आहे. सतेज पाटील राजकारणामध्ये बंटी या नावाने परिचित आहेत. त्यामुळे उपरोधक टीका करताना बंटींची आता वाजवायची घंटी अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या संजय मंडलिक यांना दारुण पराभवला सामोरे जावे लागले. कोल्हापूरमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा झाली होती. महायुतीकडून सुद्धा जोरदार ताकद लावण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच ते सहा वेळा प्रचार कोल्हापूर दौरा करत कोल्हापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. हे सर्व करून सुद्धा संजय मंडलिक यांना मोठ्या पराभवला सामोरे जागले. त्यामुळे महाराजांच्या विजयानंतर कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदे यांना डिवचणारे बॅनर झळकले होते.
आता कशी वाजवली घंटी, काँग्रेसकडून प्रत्युत्तर
महाराज विजयी झाल्यानंतर आता कशी वाजवली घंटी म्हणत कोल्हापूर शहरातील मुख्य चौकात ते बावड्यात सुद्धा फलक झळकले होते. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि सतेज पाटील यांच्यामध्ये सुरू झालेला वाद आता हा कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून सुद्धा रंगला आहे. कोल्हापूरचा उत्तरचा सस्पेन्स हा भलताच ताणला गेला. महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जाणार त्यावरून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार होता हे निश्चित होतं.
कोल्हापूर उत्तरमुळे पुन्हा वादाची ठिणगी
काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचे प्रयत्न सुरू असल्याने राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी वेटिंगवर गेली होती. मात्र, शिंदे यांनी पहिल्यांदा सत्यजति कदम यांनाच गळाला लावत क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित केली. त्यानंतर आता विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनाच पक्षात घेत उपनेतेपदी निवड केली. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे आणि पाटील आमनेसामने आले आहेत. जयश्री जाधव यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर शिंदे यांनी थेट त्यांना विमान पाठवून देत मुंबईला बोलावून घेतलं. सतेज पाटील यांनी ही फोडाफोडी गुवाहाटी व्हाया सुरतची असल्याचे सांगत शिंदेंवर तोफ डागली. तसेच ही फोडाफोडी लोकं अजूनही विसरली नसल्याचे सांगितले.
कोल्हापूर उत्तरच्या राजकारणावरून सतेज पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद चांगलाच रंगला आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये पाच नोव्हेंबर रोजी येत आहेत. त्यामुळे शिंदे काय बोलणार आणि सतेज पाटील काय प्रत्युत्तर देणार याचीही उत्सुकता असेल. त्यामुळे राजकारण जरी कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर संदर्भात असले तरी सतेज पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलाच कलगीतुरा अजूनही रंगणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या