नवी दिल्ली: आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सेलिब्रेशनसाठी अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपची राज्यं सरकारं कामाला लागली. मात्र दुसरीकडे बिहारमध्ये एनडीएचे साथीदार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र या सगळ्यापासून स्वत:ला दूर ठेवलं.
आता नितीश कुमार यांची ही नाराजी केवळ योगायोग आहे की 2019 ला पुन्हा शीर्षासन करत भाजपला झटका द्यायच्या तयारीत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अवकाश व्यापलं, मित्रपक्षांचं हृदय जिंकणार?
जमीन, पाणी, आकाश..योगदिनाच्या निमित्तानं भाजप सरकारनं सगळं अवकाश व्यापून टाकलं. पण अजूनही आपल्या मित्रपक्षांच्या हृदय त्यांना काबीज करता आलेला नाही. योगदिनाच्या कार्यक्रमांना नितीशकुमार यांनी आज दांडी मारली. केवळ तेच नव्हे, तर त्यांच्या पक्षाचा कुठलाच मंत्री, पदाधिकारी या योगाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसला नाही. गेल्या आठवड्यातली ही दुसरी वेळ आहे, ज्यावेळी नितीश कुमार यांनी भाजपसोबतचे मतभेद अशा पद्धतीनं जाहीरपणे उघड केलेत. दोनच दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी आपला पक्ष क्राईम, कम्युनिझम, करप्शनसोबत तडजोड करणार नाही असं विधान केलेलं होतं. हा इशारा होता भाजपच्या काही केंद्रीय मंत्र्यांना..जे बिहारमधलं वातावरण हिंसक बनवतायत.
‘योग करा, प्रदर्शन नको’
नितीशकुमार हे स्वत: रोज योगा करतात. योगाचं महत्व तेही जाणतात, लोकांना ऐकवतात. फक्त अशा जाहीर प्रदर्शनाला आपला विरोध आहे असं त्यांचं म्हणणं. तीन वर्षापूर्वी जेव्हा ते एनडीएत नव्हते तेव्हाही त्यांनी हे बोलून दाखवलं होतं. आताही ते यावर ठाम आहेत.
भाजप अध्यक्ष ‘मातोश्री’वर
मुळात योग हा केवळ बहाणा आहे. त्यानिमित्तानं नितीशकुमार भाजपपासून योग्य अंतर ठेवायचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. टीडीपीनं साथ सोडलीय, काश्मीरमध्येही पीडीपी बाजूला पडलीय, शिवसेनेची किंमत समजल्यानं कधी नव्हे ते आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘मातोश्री’वर पोहचू लागलेत. त्यामुळे भाजपला आपली गरज आता जास्त आहे हे त्यांनी ओळखलं आहे.
‘बिहारमध्ये मोठा भाऊ’
बिहारमधल्या लोकसभेच्या 40 जागा कशा लढवायच्या यावरुनही ठिणग्या पडू लागल्या आहेत. मागच्यावेळी भाजप आणि जेडीयू सोबत नव्हते. बिहारच्या 40 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या, तर 6 जागा त्यांचे मित्रपक्ष पासवान, कुशवाह यांच्या पक्षानं जिंकल्या. जेडीयूला तेव्हा केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. पण तरीही राज्यावर कब्जा असल्यानं बिहारमध्ये आपणच मोठे भाऊ आहोत असा दावा जेडीयूनं सुरु केलाय.
पुन्हा महाआघाडीत येण्याची साद
सर्वच मित्रपक्ष साथ सोडून चालल्यानं भाजपला वाकवण्याची हीच वेळ आहे हे बहुधा नितीशकुमार यांनी ओळखलंय. त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत 15 पेक्षा कमी जागा बिहारमध्ये लढणार नाही असं जेडीयूच्या नेत्यांनी जाहीर करुन टाकलंय. या दोघांमधली ही रस्सीखेच बघून तिकडे काँग्रेसचे बिहार प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनीही नितीशकुमार यांना भाजपची साथ सोडून पुन्हा महाआघाडीत सामील होण्याची हाक दिलीय.
नितीशकुमार वाजपेयींच्या काळातही एनडीएमध्ये होते. त्यांना भाजपपेक्षाही 2014 ला मोदींचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा जास्त खटकत होता. त्यासाठी त्यांनी प्रसंगी आपले कट्टर शत्रू लालू यादव यांचीही मदत घेतली. पण ही साथ फार काळ टिकली नाही. 2019 च्या निवडणुका जवळ येत असताना, एनडीएच्या गोटातल्या मित्रपक्षांची संख्या कमी होत चालली असताना, नितीशकुमार पुन्हा एकदा आपले रंग दाखवू लागलेत. त्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर चाललेत की काय असाही प्रश्न उपस्थित होतो.
योग दिनाला दांडी मारणारे नितीश कुमार शिवसेनेच्या वाटेनं चाललेत?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2018 03:27 PM (IST)
जमीन, पाणी, आकाश..योगदिनाच्या निमित्तानं भाजप सरकारनं सगळं अवकाश व्यापून टाकलं. पण अजूनही आपल्या मित्रपक्षांच्या हृदय त्यांना काबीज करता आलेला नाही. योगदिनाच्या कार्यक्रमांना नितीशकुमार यांनी आज दांडी मारली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -