कोटा: आंतरराष्ट्रीय योग दिनी योगगुरु बाबा रामदेव यांनी एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या कोटामध्ये २ लाखांहून अधिक लोकांसोबत एकाच वेळी योग करत विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. या प्रसंगी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंदरा राजेही उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं हे चौथं वर्ष असून २०१५मध्ये पहिल्यांदा योग दिन साजरा करण्यात आला होता.
राजस्थान सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राजस्थान सरकारनं या कार्यक्रमासाठी रामदेव बाबांना निमंत्रण दिलं होतं.यावेळी कार्यक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीमदेखील उपस्थित होती. एकाच वेळी दोन लाखांहून अधिक लोकांनी योगासनं केल्यानं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगासनासाठी २ लाखांहून अधिक लोक कोटा येथे जमले होते. हजारो विद्यार्थी योग शिबिरात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त करण्यासाठी योग सर्वात योग्य पद्धत आहे, असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.
बाबा रामदेव यांनी मागील वर्षी २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं होतं. त्यावेळी त्यांनी ५४,५२२ लोकांसोबत योगा केला होता. त्याआधी त्यांनी ३५,९८४ लोकांसोबत एकत्र योग अभ्यास केला होता. या योग शिबिरात पंतप्रधानही सहभागी झाले होते.