Raisina Dialogue : "युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धातून (Russia-Ukraine War) भारतीय सशस्त्र दलांनीही धडा घेतला पाहिजे की त्यांनी शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणांच्या पुरवठ्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहू नये," असं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल अनिल चौहान (CDS General Anil Chauhan) म्हणाले. तसंच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता सुनिश्चित करण्यासाठी, सरकार उपकरणे आणि शस्त्रास्त्र प्रणालींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा पर्याय देत आहे, असंही त्यांनी म्हटलं. दिल्लीत सुरु असलेल्या 'रायसीना डायलॉग'मधील (Raisina Dialogue) संवादात्मक सत्रात ते शुक्रवारी (3 मार्च) बोलत होते. 


'शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याची गरज'


अनिल चौहान म्हणाले की, "आपल्याला स्वावलंबी बनण्याची गरज आहे. हा (युक्रेन युद्ध) आपल्यासाठी सर्वात मोठा धडा आहे. आपण आपल्या शस्त्रास्त्रांसाठी बाहेरुन (इतर देशातून) येणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून राहू शकत नाही. युद्धातून हाच मोठा धडा आपल्याला शिकायला मिळतो."


आधुनिक काळातील युद्धे "लहान आणि वेगवान" होतील असं एक समज होता. परंतु युक्रेनमध्ये आपण जे पाहत आहोत ते एक दीर्घ युद्ध आहे, असं अनिल चौहान यांनी सांगितलं.


आपल्याला दीर्घ लढाईची तयारी करावी लागेल : अनिल चौहान


युक्रेन युद्धामुळे देशांनी अल्पकालीन युद्धाची क्षमता विकसित करावी का किंवा दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहावं का, असे प्रश्नही उपस्थित होत असल्याचं ते म्हणाले. सीडीएस चौहान म्हणाले की, "भारताच्या बाबतीत, भविष्यात आपल्याला कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागेल हे पाहावं लागेल. पण युरोपात जे काही मोठं युद्ध सुरु आहे, तसे मोठं युद्ध इथेही घडेल, असं आम्हाला वाटत नाही.


पॅनेल चर्चेदरम्यान चौहान म्हणाले की, "कोणताही संघर्ष अनेक दृष्टीकोनातून पाहिला जाऊ शकतो. मग तो राजकीय दृष्टिकोन असू शकतो, किंवा आर्थिक दृष्टिकोन किंवा राजनैतिक दृष्टिकोन असू शकतो. पण एक लष्करी अधिकारी आणि सीडीएस म्हणून मी याकडे युद्धाकडे दोषी अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून पाहतो."


ऑस्ट्रेलियन संरक्षणप्रमुखांची रशियावर टीका


दरम्यान या सत्रातातील आपल्या भाषणात ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अँगस जे कॅम्पबेल यांनी रशिया-युक्रेन युद्धावरुन रशियावर टीका केली. "हा बेकायदेशीर, अन्यायकारक आणि निर्दयी हल्ला आहे आणि सार्वभौम राष्ट्राच्या अखंडतेचे उल्लंघन करतो," असं ते म्हणाले.


2 ते 4 मार्च दरम्यान 'रायसीना डायलॉग'चं आयोजन


परराष्ट्र मंत्रालयाने 2 ते 4 मार्च दरम्यान ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (URF) च्या सहकार्याने 'रायसीना डायलॉग'चं आयोजन केलं आहे. "प्रोव्होकेशन, अनसर्टन्टी, टर्ब्युलेन्स: लाईटहाऊस इन द टेम्पेस्ट" या थीम अंतर्गत आयोजित या परिषदेत 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.