Belgaum Accident News : स्कूल बस आणि ट्रक (School Bus and Truck Accident) यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहाहून अधिक विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे हा अपघात घडला. अपघातात स्कूल बस आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. अथणीहून स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन बनजवाड येथे निघाली होती. त्यावेळी प्लास्टिक पाईप भरून नेणाऱ्या ट्रकची आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनी बसमधून प्रवास करत होत्या. अपघात झाल्यावर विद्यार्थिनी घाबरून गेल्या होत्या. यावेळी बसमध्ये अडकून पडलेल्या एका विद्यार्थिनीला अपघातस्थळी जमलेल्या लोकांनी बाहेर काढले. अपघातस्थळी विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग आणि जेवणाचे डबे विखुरले होते. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात झाल्यावर काही विद्यार्थिनी अडकून पडल्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज, शनिवारी सकाळी साडेसात वाजता स्कूल बस (School Bus) विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. त्यावेळी मिरजहून अथणीकडे पाईप भरून येणाऱ्या ट्रकची आणि स्कूल बसची जोरदार धडक झाली.अपघात झाल्यावर बसमधील विद्यार्थ्यांनी घाबरून आरडाओरडा केला.जखमी विद्यार्थिनींना पाहून अन्य विद्यार्थी घाबरून गेले होते. बसमधे अपघात झाल्यावर काही विद्यार्थिनी अडकून पडल्या होत्या. त्यांना तेथे जमलेल्या लोकांनी बऱ्याच प्रयत्नानंतर बाहेर काढले. स्कूल बस चालकाच्या जवळ बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिक इजा झाली आहे. बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी हे पर गावचे असून अथणी येथे हॉस्टेलमध्ये राहतात. या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून हायस्कूल आणि कॉलेजकडे नेत असताना अपघात घडला. अपघात झाल्यावर जमलेल्या लोकांनी विद्यार्थ्यांना पाणी पाजून धीर दिला आणि त्यांना रुग्णवाहिकेत बसण्यास मदत केली. अथणी पोलिसांनी अपघाताचे वृत्त कळताच त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. नंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या