Belgaon News : बेळगाव (Belgaon) जवळील बिजगर्णी इथे हेस्कॉमच्या (Hescom) हलगर्जीपणामुळे तरुण शेतकरी दाम्पत्याचा (Couple) मृत्यू झाला. रविवारी (6 ऑगस्ट) शेतात रताळ्यावर औषध फवारणी करत असताना निसार सनदी यांच्यावर विजेची तार (Electric Wire) पडली. यावेळी त्यांना वाचवायला गेलेल्या त्यांची पत्नीलाही (Wife) विजेचा धक्का बसला. या घटनेत दोघांचाही शेतात मृत्यू झाला. रविवारी पहाटे घडलेल्या या धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.


चिमुकलीच्या डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं


अमित उर्फ निसार महमद मकबूलसाब सनदी (वय 32 वर्षे) आणि लता निसार उर्फ अमित महमद सनदी (वय 26 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. त्यांना एक लहान मुलगी आहे. या दुर्घटनेत दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने मुलीच्या डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे.


पतीला विजेचा धक्का बसला, पत्नी वाचवण्यासाठी धावली अन्...


हे दाम्पत्याने आपल्या शेतात रताळ्याची लागवड केली. रविवारी पहाटे रताळ्यावर औषधांची फवारणी असताना ही दुर्दैवी घटना घडली. जवळच्या खांबाला जोडलेली विद्युत तार अचानक तुटली आणि निसार सनदी यांना विजेचा धक्का बसला. पतीला विजेचा धक्का बसल्याचं दिसताच पत्नी त्याला वाचवण्यासाठी पुढे आहे. परंतु पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा झटका बसला आणि दोघे जागीच गतप्राण झाले. हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा बळी गेला आहे.


हेस्कॉम कंपनीचं गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष


शेतातून जाणार्‍या 11 केव्ही व्होल्टच्या वीजेच्या तारा अनेक वर्षांपासून गंज लागल्याची बाब समोर आली.  या तारांच्या धोकादायक अवस्थेबाबत ग्रामस्थांनी वारंवार चिंता व्यक्त करुन त्या तातडीने बदलाव्यात, अशी मागणी गावकर्‍यांनी वेळोवेळी हेस्कॉमकडे केली होती. पण वीज पुरवठा कंपनीच्या दुर्लक्षामुळे अशा तारा अजूनही धोकादायक स्थितीत आहेत. परंतु गावकऱ्यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्या दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला. बेळगावच्या ग्रामीण भागाला आजही अनेक धोकादायक विजेच्या तारांचा धोका कायम आहे.


सांगलीत दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू


अशीच घटना काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात घडली होती. आटपाडीमध्ये (Atpadi) दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू झाला होता. अनिकेत अमृत विभुते (वय 24 वर्षे रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड (वय 45 वर्षे रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर ) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गुरुवारी (20 जुलै) दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. आटपाडी तलावात पाणी पातळी कमी झाल्याने पाण्यातील विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी हे दोघे जण गेले असताना त्यांना विजेचा शॉक बसला, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.


हेही वाचा


Belgaon Crime : बेळगावातील बेपत्ता जैन मुनींची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न, हत्या करुन मृतदेह विहिरीत टाकला