नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या आमदारांचं अटकसत्र सुरुच आहे. कारण सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आपचे आमदार सोमनाथ भारती यांना अटक झाली आहे.


सोमनाथ यांनी ऑल इंडिया इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात एम्समध्ये सुरक्षा रक्षकांशी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांना दिल्ली पोलिसांनी आज सकाळी अटक केली.

एम्सचे मुख्य सुरक्षा अधिकारी आर एस रावत यांनी सोमनाथ भारतींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

स्वत: सोमनाथ भारती यांनीच आपल्याला अटक झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली.

काय आहे वाद?

एम्सची एक भिंत तोडण्यासाठी सोमनाथ भारती एक जेसीबी आणि जमाव घेऊन आले होते. एम्सच्या भिंतीच्या मागे एक रस्ता आहे. त्याच्या डागडुजीचं काम सुरु आहे, त्यासाठी भिंत हटवण्याचा सोमनाथ भारतींचा मानस होता.

जो रस्ता आहे तो PWD चा आहे, मात्र तो बंद केल्याने एम्सला पोहोचण्यासाठी फेरा मारावा लागतो. जर ती भिंत हटवली, तर नागरिकांना ये-जा करणं सुलभ होईल, असा स्थानिकांचा दावा आहे. मात्र हीच भिंत हटवण्याच्या प्रयत्नात, भारतींची सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे.

यापूर्वी 'आप'च्या कोणत्या आमदारांना अटक?

*आपच्या आमदारांचं अटकसत्र सुरु आहे. कालच आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. खान यांच्या लहान भावाच्या पत्नीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.