Basweshwar Jayanti 2023 : महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक तसेच धर्मगुरू असून त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात 1131 साली अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya 2023) झाला. त्यानुसार वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेला बसवेश्वर जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी त्रेतायुगाची सुरूवात झाली. तर उत्तर भारतामध्ये या दिवसापासून सत्ययुगाचा प्रारंभ झाला अनेकांची अशी धारणा आहे. आजच्या या मंगलमय दिवशी आपण त्यांची शिकवण आणि विचार जाणून घेऊयात.


कर्मकांडाला विरोध


बसवेश्र्वरांनी स्वतःचा उपनयन-संस्कार करून घ्यायचे नाकारले, यावरून बालपणापासूनच त्यांचा भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये, तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही यांसारख्या मतांवरूनही त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते. 


महात्मा बसवण्णांची शिकवण 


महात्मा बसवण्णांनी जनसामान्यांना सहज साधी शिकवण दिली. त्यांची शिकवण सामान्य माणसासाठी आहे. ती सहज साधी आणि सोपी आहे. संसारी माणसाच्या जगण्याचे जीवन तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. ते घरोघरी जात. शरणूशरणार्थी करत. शरण कक्कय्या, हरळय्या, चेन्नय्या, नुलीय चंदय्या, मडिवाळ माचीदेव, आणि घटीवाळय्या या कष्टकरी, दीनदलित, आदिवासी, अठरा आलुतेदार, बारा बलुतेदार, यांना बसवण्णा एकत्र करू लागले.


एकाच देवाची इष्टलिंगाची साधना करा. देहच देवालय आहे. एकत्र या चर्चा करा. सुसंवाद करा. स्त्रियांना समान अधिकार द्या. पंचसूतके पाहू नका. दलितांना समान संधी द्या. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका. कोंबडे-बकरे कापू नका. स्वकष्टावर जगा. भिक्षा मागून खाऊ नका. काम कष्ट करा. कायकात कैलास आहे. दासोह समाजसेवा आहे. पर्यावरण रक्षण करा. दगडधोंडे पुजू नका. पुरोहिताच्याहस्ते देवपूजा करू नका. ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र, पंचांग पाहू नका. यज्ञ, होम-हवन करु नका. अनुभव मंटपात बसा. प्रश्न उत्तर करा, चर्चा करा. वचन साहित्य द्या. शुभाशुभ पाहू नका. नदी-स्नान करू नका. एकमेकांच्या पाया पडू नका. शरणूशरणार्थी म्हणा. संन्यासवादाचे उदात्तीकरण करू नका. संसारिक जीवन जगा. अस्पृश्यता पाळू नका. माणसाला माणसाप्रमाणे वागवा. पशुहत्या करू नका. जिवंत नागाला मारून चित्रातल्या नागाची पूजा करू नका, विसंगत व्यवहार सोडून द्या. मांसाहार करू नका व्यसनाधीन बनू नका. चोरी करु नका. हत्या करु नका. रागावू नका. खोटे बोलू नका. कोणाची घृणा करु नका. दया हाच धर्म आहे. अशी अनेक शिकवण बसवण्णांनी दिली. 


महत्त्वाच्या बातम्या :


Important Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी