नवी दिल्ली: दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने भाजपवर गंभीर आरोप लावला आहे. आम आदमी पक्षाने एक ट्वीट करत सांगितलंय की दिल्ली पोलीसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवलंय. कोणालाही मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं जात नाही आणि कोणालाही घरातून बाहेर सोडलं जात नाही असाही आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. केजरीवाल यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन दिल्यानं त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं आपनं म्हटलं आहे.
दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर गेल्या 13 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं आपनं सांगितलं आहे. आपने आपल्या ट्वीटमध्ये भाजप बदल्याचं राजकारण करत असल्याचाही आरोप केलाय.
दिल्ली पोलीसांनी आपने केलेल्या या आरोपांचं खंडन केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप चुकीचा असल्याचाही पोलीसांनी सांगितलं. उत्तर दिल्लीचे डीसीपी अॅन्टो अल्फोन्स यांनी सांगितलं की, "अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याचं वृत्त निराधार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री या नात्याने ते कुठेही जाऊ शकतात."
अरविंद केजरीवाल सोमवारी सकाळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला सिंघु बॉर्डरवर गेले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवला. त्यांनी सांगितलं की, "शेतकऱ्यांची मागणी न्यायपूर्ण आहे आणि केंद्र सरकारने त्यांची मागणी मान्य करायला हवी."
पहा व्हिडिओ: Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत, आपचा आरोप
महत्वाच्या बातम्या:
- Bharat Bandh : बंदला महाराष्ट्रातील 'या' शेतकरी संघटनांचा पाठिंबा नाही, काय आहे कारण?
- Farmers Protest | नव्या कृषी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार केरळ सरकार