नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर अनेकांनी अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला आहे. आता त्यांच्याबद्दल अशाच प्रकारची टिप्पणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. बराक ओबामा यांनी आपल्या 'अ प्रॉमिस्ड लॅन्ड' या पुस्तकात राहुल गांधी यांच्याबद्दल मत नोंदवलं आहे. त्यात ते म्हणतात की, "राहुल गांधी हे एक असे विद्यार्थी आहेत ज्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत. परंतु संबंधित विषयात प्राविण्य मिळवण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यासाठी जी चिकाटी असायला हवी तिचा अभाव राहुल गांधींमध्ये आहे."
ओबामा यांनी राहुल गांधींचा उल्लेख 'नर्व्हस' असा केला आहे. तसेच ते म्हणतात की, "नेतृत्व करण्यासाठी जी योग्यता लागते त्याचा अभाव राहुल गांधी यांच्यात दिसतोय. बराक ओबामा हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असताना दोन वेळा भारत दौऱ्यावर आले होते. ओबामांची 2015 आणि 2017 साली राहुल गांधी यांच्याशी भेट झाली होती.
राहुल गांधींबद्दल असे निरीक्षण नोंदवणाऱ्या ओबामांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दल मात्र कौतुकाचे शब्द वापरले आहेत. ते म्हणतात, "मनमोहन सिंह एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे."
बराक ओबामा यांनी त्याच्या 'अ प्रॉमिस्ड लॅन्ड' या राजकीय जीवनचरित्रात जगभरातील नेत्यांच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यामध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि अमेरिकन नियोजित राष्ट्रपती जो बायडन यांचाही उल्लेख केला आहे. ओबामा यांचे हे पुस्तक 17 नोव्हेंबर रोजी बाजारात येणार आहे.
राहुल गांधींच्याबद्दल हे निरीक्षण नोंदवल्याने कॉंग्रेस पक्षात बराक ओबामा यांच्याबद्दल नाराजी पसरली आहे. ट्विटरवर ओबामा यांच्याविरोधात '#माफ़ी_माँग_ओबामा' हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नोटबंदी हा पंतप्रधानांनी रचलेला कट : राहुल गांधी
- पेट्रोल-डिझेलवर करवाढीची शक्यता; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...
- बराक ओबामांकडून मराठमोळ्या राहुल तेंडुलकरचं कौतुक, कोण आहेत राहुल?
- US Election Result : बायडन यांनी मोडला ओबामांचा रेकॉर्ड; अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार