नवी दिल्ली: या वर्षी कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा अस्थिर झाला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने आता पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटी वाढवण्याची तयारी सुरु केल्याच्या बातम्या येत आहेत. या प्रश्नावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. राहुल गांधींनी त्यांच्य़ा सोशल मीडियावरुन पंतप्रधानांना आवाहन केलंय की त्यांनी सामान्य लोकांची लूट थांबवावी, आपल्या मित्रांना पैसे देणे बंद करावे आणि आत्मनिर्भर बनावे.
राहुल गांधीनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रधानमंत्रीजी, जनतेला लूटायचे बंद करा, "आपल्या मित्रांना पैसे द्यायचे बंद करा आणि आत्मनिर्भर व्हा |"
कोरोनामुळे देशावर आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आता विविध योजना आखत आहे. त्यापैकी एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरच्या एक्साईज ड्यूटीत वाढ करणे हे होय. सरकारने हे पाऊल उचलले तर एका वर्षात 60 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. जर चालू आर्थिक वर्षाचा विचार केला तर किमान 30 हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत.
याबाबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीमध्ये वाढ करताना त्याच्या रिटेल किंमतीवर याचा परिणाम होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येणार आहे. सरकारच्या मते पेट्रोल आणि डिझेलच्या रिटेल किंमतीवर एक्साईज डयूटी वाढीचा परिणाम झाला तर त्यामुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. काही तज्ञांच्या मते पेट्रोल आणि डिझेलवरचा एक्साईज कर वाढवण्यासाठी सध्याची स्थिती ही एकदम योग्य आहे कारण गेल्या महिन्याभरात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 40 डॉलर इतकी आहे. त्या आधी ही किंमत 45 डॉलर प्रति बॅरेल होती. या वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने संसदेत कायदा पास करुन पेट्रोलवर 18 रुपये आणि डिझेलवर 12 रुपये इतका एक्साईज ड्यूटीची वाढ करण्याचा अधिकार प्राप्त केला होता. त्यानंतर मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवर 12 रुपये आणि डिझेलवर 9 रुपये इतका एक्साईज कर वाढवला होता.
भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलवर 70 टक्के कर लावण्यात येतोय. अशा परिस्थितीत जर पुन्हा एकदा सरकारने त्यावरच्या एक्साईज ड्यूटीत वाढवण्याचा निर्णय घेतला तर हा कर 75 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
संबंधीत बातम्या: