जयपूर : राजस्थानच्या झुंझुनूमध्ये बँक थकबाकीचं अजब प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाला बँकेची थकबाकीची नोटीस आली होती. ज्यानुसार बँकेची 50 पैसे थकबाकी खातेदाराला भरण्याचे आदेश बँकेने दिले होते. नोटीस मिळाल्यानंतर तरुणाने याबाबत कुटुंबियांना माहिती दिली, त्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. बँकेची नोटीसनुसार तरुणाचे वडील न्यायालयात हजर झाले. प्रकरणाची माहिती ऐकून न्यायधीश देखील थक्क झाले.


जितेंद्र कुमार या तरुणाचं भारतीय स्टेट बँकेत जनधन खातं आहे. या खात्यात त्याच्या नावे एकूण 124 रुपये जमा आहेत. 12 डिसेंबरला जितेंद्र कुमारला बँकेने नोटीस पाठवली आणि 50 पैसे थकबाकी असल्याचं कळवलं. नोटीसमध्ये जितेंद्रला खेतडी येथील न्यायालयात शनिवारी (15 डिसेंबर) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच न्यायलयात 50 पैसे जमा करण्यासही सांगण्यात आलं होतं. न्यायलयात हजर राहून पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीदही नोटीसमध्ये देण्यात आली होती.


जितेंद्रला पाठीच्या मनक्याचा त्रास असल्याने न्यायालयात हजर राहू शकत नव्हता. त्यामुळे जितेंद्रचे वडील विनोद सिंह न्यायालयात हजर झाले. मात्र प्रकरण पाहून न्यायधीश आणि इतर लोकही आश्चर्यचकीत झाले. जितेंद्र न्यायलयात हजर झाल्यानंतर मात्र बँकेचे अधिकारी न्यायालयातून निघून गेले.





जितेंद्रची तब्येत ठिक नसल्याने त्याच्या वडिलांनी बँकेत जाऊन पैसे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे बँक अधिकाऱ्यांनी पैसे घेण्यास नकार दिला, असं जितेंद्रच्या वडिलांनी सांगितलं. बँकेला पैसे परत करण्यासाठी चकरा मारुनही बँक पैसे घेत नाही. बँकेविरोधात कायदेशीर कारवाई आणि मानहानीचा खटला भरणार असल्याचं जितेंद्रच्या वकिलांनी सांगितलं. बँकेने नोटीस पाठवली, मात्र आता पैसे घेण्यास नकार देत आहे, त्यामुळे जितेंद्रसह त्याचं कुटुंब चिंतीत असल्याचं वकिलांनी सांगितलं.