मुंबई : पीएनबीच्या कर्ज घोटाळ्यानंतर देशातला चौथा बँक घोटाळा समोर आला आहे. सर्व घोटाळे समोर आल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रानेही कर्ज थकवणाऱ्या चार उद्योजकांविरोधात सीबीआयकडे तक्रार केली. बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.
बँक ऑफ महाराष्ट्रने दिल्लीतील उद्योजक अमित सिंगलाविरोधात तक्रार दिली. तक्रारीनुसार, सिंगलाची कंपनी 'आशीर्वाद चेन'ने बँक ऑफ महाराष्ट्राकडून 9.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं, जे आतापर्यंत परत केलेलं नाही. या तक्रारीत अमित सिंगलासह त्याचे वडील रोशनलाल आणि आई सुमित्रा देवी यांच्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे.
पीएनबीला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी देशातून फरार आहेत. तर रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी यालाही बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सनेही एका उद्योगपतीविरोधात सीबीआयकडे तक्रार केली आहे आणि आता बँक ऑफ महाराष्ट्राचं हे प्रकरण समोर आलं आहे.
पीएनबी घोटाळा
हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीने बनावट एलओयू अर्था लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या आधारावर पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकून नीरव मोदीच्या संपत्तीवर छापेमारी सुरु आहे.
रोटमॅक कर्ज घोटाळा
रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीने विविध सात बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ते परत केलं नाही. याच प्रकरणी सीबीआयने त्याला अटक केली आहे.
कर्ज घेतलेल्या बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचा सहभाग आहे.
कोठारी कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आणि संचालकीय व्यवस्थापक आहे. सीबीआयने अनेक बनावट कागदपत्रही जप्त केले आहेत, ज्यातून हा घोटाळा कधीपासून करण्यात आला, ते समोर आलं आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
दिल्लीत द्वारकादास शेठ प्रायव्हेट लिमिटेडने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला 389 कोटींचा चुना लावला. याप्रकरणी सीबीआयने हिरा व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीचे संचालक सभ्य शेठ, रीता शेठ, कृष्णकुमार सिंह, रवी सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीचे संचालक सध्या दुबईत आहेत.
2007 ते 2012 याकाळात कंपनीने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सकडून 389 कोटींचं कर्ज घेतलं. विशेष म्हणजे पीएनबी घोटाळ्याप्रमाणे इथेही लेटर ऑफ अंडरटेकिंग अर्थात एलओयूद्वारे कर्ज देण्यात आलं. त्याची परतफेडच केली नाही.