नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विक्रम कोठीरीच्या कर्ज घोटाळ्यानंतर आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीत द्वारकादास शेठ प्रायव्हेट लिमिटेडने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला 389 कोटींचा चुना लावला. याप्रकरणी सीबीआयने हिरा व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीचे संचालक सभ्य शेठ, रीता शेठ, कृष्णकुमार सिंह, रवी सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीचे संचालक सध्या दुबईत आहेत.
2007 ते 2012 याकाळात कंपनीने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सकडून 389 कोटींचं कर्ज घेतलं. विशेष म्हणजे पीएनबी घोटाळ्याप्रमाणे इथेही लेटर ऑफ अंडरटेकिंग अर्थात एलओयूद्वारे कर्ज देण्यात आलं. त्याची परतफेडच केली नाही.
6 महिन्यांपूर्वी याप्रकरणी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने सीबीआयकडे तक्रार दिली होती. दरम्यान आरोपी दुबईत लपल्याची शक्यता असून लूकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती आहे.