भारत : भारत (India) आता चंद्रावर पोहोचला आहे. 23 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. याच दरम्यान इस्रो (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांनी भारताकडे चंद्राचे (Moon) सर्वोत्तम फोटो असल्याचं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील तिरुवनंतपुरममधील एका कार्यक्रमामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, "आपल्याकडे चंद्राचा सर्वात जवळचा फोटो आहे आणि तो जगात कोणाकडेही नाही. इतका जवळचा फोटो कोणाजवळच नाही. या सर्वांना हा फोटा मिळवण्यासाठी इस्रोच्या  कॉम्प्युटर सेंटर आणि इंडियन स्पेसक्राफ्ट एक्सप्लोरेशन मिशन डेटा सेंटरशी संपर्क साधावा लागणार आहे."


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माहिती


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माहिती देताना त्यांनी म्हटलं की, "लँडर आणि रोव्हर दोघेही त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत. चांद्रयान -3 मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे सुस्थितीत आहेत आणि त्यांच्यामध्ये लावण्यात आलेली पाचही उपकरणं ही व्यवस्थित काम करत आहेत. तसेच येत्या दहा दिवसांमध्ये सर्व प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. रोव्हरच्या देखील वेगवेगळ्या चाचण्या करायच्या आहेत. कारण रोव्हर हे चंद्रावरील खनिजांचे परीक्षण करणार आहे."


गगनयान मिशनवर इस्रो प्रमुखांचं भाष्य


गगनयान मिशनवरही इस्रो प्रमुखांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "गगनयान मिशनसाठी आमची तीच टीम काम करत आहे. आमच्याकडे गगनयान, चांद्रयान किंवा आदित्यसाठी वेगवेगळ्या टीम नाहीत. आमच्याकडे त्याच टीम आहेत, त्या अत्याधुनिक पद्धतीने काम करणार आहेत. चांद्रयान ज्या विश्वासाने आम्ही पूर्ण केलं त्याच विश्वासाने आम्ही गगनयान देखील यशस्वी करु." 


चांद्रयाननंतर इस्रोकडून अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा पूर्ण केल्या जाणार आहेत. यामध्ये गगनयान, मिशन आदित्य यांचा देखील समावेश आहे. यामधील मिशन आदित्य हे सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात येणार आहे. तर गगनयान मिशनच्या माध्यमातून भारत चंद्रावर रोबोट व्योममित्रला पाठवणार आहे. ही एक फीमेल रोबोट असणार आहे. त्यामुळे चांद्रयानानंतर भारत आणखी काही इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. इस्रोच्या पुढील मोहिमांची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच या मोहिमा देखील फत्ते करणार असल्याचा विश्वास इस्रो प्रमुखांनी व्यक्त केला आहे. 


हेही वाचा : 


Gaganyaan: ''गगनयान' अंतराळ मोहिमेआधी इस्रोचा मोठा निर्णय; 'व्योममित्र' रोबोट पाठवणार अंतराळात