नवी दिल्ली : 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात चर्चेत असणाऱ्या या प्रकरणाचा अखेर निकाल दिला. यावर देशातील राजकीय वर्तुळातील काही नेत्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.


कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो : राजनाथ सिंह


लखनौ विशेष न्यायालयाने बाबरी मशीद विध्वंस केसमध्ये श्री लालकृष्ण अडवाणी, श्री कल्याण सिंह, डा. मुरली मनोहर जोशी, उमाजी यांच्यासह 32 लोकांची निर्दोष मुक्तता केली, या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे हे सिद्ध झालं की, उशीरा का होईना न्यायाचा विजय झाला'


हा आनंदाचा क्षण : साक्षी महाराज


'तिथं बाबरी नव्हतीच, प्रभू श्रीरामाचं मंदिर होतं, शिक्षा झाली असती तरी स्वीकारली असती, हा आनंदाचा क्षण आहे.', कोर्टाच्या निकालावर आनंद व्यक्त करत साक्षी महाराज यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.


आम्हाला भीती नव्हती : साध्वी ऋतंभरा


'सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करावं. दूध का दूध पानी का पानी झालं. आत्मविश्वास होता. याबाबत आम्हाला भीती नव्हती. सत्याचा विजय झाला.' , असं म्हणत साध्वी ऋतंभरा यांनी कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.


आता ती घटना विसरायला हवी : संजय राऊत


'कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो. सर्वांना निर्दोष सोडले आहे. कोर्टाने कट नसल्याचे सांगितले आहे. आता त्या घटनेला विसरायला हवं. अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांचे अभिनंदन करतो.', असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं


बाबरी मशिदीवरील निकाल हा दु:खद आणि आश्चर्यजनक : सचिन सावंत


'बाबरी मशिदीवरील निकाल हा दु:खद आणि आश्चर्यजनक आहे. तिथे बाबरी मशीद नव्हतीच, असा दावाही येत्या काळात केला जाऊ शकेल. गेली अनेक वर्षे न्याय रखडला त्यामुळे, जस्टीस डिले जस्टिस डिनाईड या तत्वानुसार या निकालाकडे पहाता येईल. ज्यावेळी बाबरी मशीद पाडली जात होती, तेव्हा पोलीस कसे निघुन जात होते हे सर्वांनी पाहिलंय. बाबरी मशिद पाडणं हा पूर्वनियोजित कट नव्हता, असं म्हणटलं गेलंय कारण, महत्वाच्या केसेस सरकार सक्षमपणे लढलेलं नाही. समोरासमोर बाबरी मशीद पाडली गेलीय, तरी असे निष्कर्ष निघत असतील तर ते दु:खद आहे.' असं काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत म्हणाले.


या आरोपींची निर्दोष मुक्तता


लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर


या निकालानंतर विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी सेलिब्रेशन सुरु केलं आहे. मुंबई भाजप कार्यालयात देखील जल्लोष केला आहे. तसंच निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींनी देखील आनंद व्यक्त केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :