नवी दिल्ली: योग गुरू बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीच्या वतीनं उत्तराखंड सरकारच्या मदतीने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन रुग्णालयं सुरु करण्यात आली आहेत. या रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांवर कोरोनाच्या उपचारांसोबत आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी पद्धतीने उपचार करण्यात येतील. याची माहिती स्वत: बाबा रामदेव यांनी दिली आहे. 


बाबा रामदेव म्हणाले की, "या रुग्णालयात 100 टक्के आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी पद्धतीने उपचार करण्यात येतील. ही एक आहार चिकिस्ता असेल. ज्या रुग्णांना गरज असेल त्यांना स्टेरॉइड्स देखील देण्यात येतील."


 




पतंजलीच्या या रुग्णालयात सर्वच बेड्सच्या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा पुरवण्यात आल्याची माहिती योग गुरू बाबा रामदेव यांनी दिली. जर या ठिकाणी कोणत्या रुग्णांची परिस्थिती गंभीर झाली तर त्याला आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधाही पुरण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त रुग्णांकडून प्राणायम करून घेण्यात येईल तसेच त्यांना म्युझिक थेरपी आणि मड थेरपीही देण्यात येईल.


पतंजलीच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या या रुग्णालयात अॅलोपॅथी आणि एमबीबीएस तसेच एमडी डॉक्टर्सही असतील. या ठिकाणी प्रत्येक पद्धतीचा उपचार करण्यात येईल असंही पतंजलीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


गेल्या वर्षी कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला होता. या औषधानं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबांनी केला होता. त्याला जागतिक आरोग्य संघटेनेने प्रमाणपत्र दिल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यावर पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याची बातमी खोटी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केलं होतं.


महत्वाच्या बातम्या: