मुंबई : देशभरातील कोरोना स्थिती पाहता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय कधी घेतला जाणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून विचारला जातोय. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला विद्यार्थी अभ्यास करत आहेत. मात्र, सीबीएसई (CBSE) आणि राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप काहीच स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा न घेता ती रद्द करून इतर पर्यायांचा विचार करावा आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. तर बारावी परीक्षांबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की बारावीचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. त्यामुळे शासनानं लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन, बारावीच्या परीक्षांसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.
कोरोनामुळे दहावी परीक्षा रद्द झाली मग बारावी परीक्षेचं काय? दहावी प्रमाणे बारावी परीक्षांबाबत सारखाच निर्णय का नाही? विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस बारावीचा अभ्यास करायचा? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून केले जात आहेत. याव्यतिरिक्त #cancel12boardexam2021 ही मोहीमसुद्धा ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. कारण सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावात ऑफलाइन परीक्षा शक्य नसल्यामुळे इतर पर्यायांची तातडीनं चाचपणी करुन योग्य तो निर्णय घ्यावा, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
राज्यातील जवळपास दीड लाख बारावीचे विद्यार्थ्यी आहेत. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका सर्वेत 78 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तर 11 टक्के विद्यार्थ्यांनी इतर पर्याय अवलंबून परीक्षा घ्यावी, असं म्हटलं आहे. तर इतर 11 टक्के विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा द्यायला तयार आहेत, असं स्पष्ट होत आहे.
पाहा व्हिडीओ : HSC Exam 2021 : विद्यार्थ्यांनी बारावीचा अभ्यास करावा की प्रवेश परीक्षांचा? HSC चा निर्णय कधी घेणार?
खरंच दहावीप्रमाणे बारावी ऑफलाइन परीक्षा रद्द करणे आणि अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य आहे का? 12 वी नंतर प्रवेशावर त्याचा परिणाम होऊ शकतो का? यासंदर्भात तज्ज्ञांशी संवाद साधला असता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावी ऑफलाइन परीक्षा रद्द केल्यास अंतर्गत मूल्यांकन करून त्याबाबत समान निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करता येऊ शकतो. तसेच अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी बारावी गुणांचा निकष यावर्षी शिथिल देखील करता येऊ शकतो. बारावी नंतर इंजिनीरिंग, मेडिकल आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना इतर प्रवेश परीक्षांच्या आधारे आधारे प्रवेश दिला जाऊ शकतो. आर्टस् , कॉमर्स आणि इतर अभ्यासक्रम ज्यांची प्रवेश परीक्षा होत नाही, त्या अभ्यासक्रमना सुद्धा विद्यापीठ, कॉलेज स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाऊन, त्याआधारे प्रवेश देता येऊ शकेल.
तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही गोष्टी शक्य असल्या तरी यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्याच्या शिक्षण विभागाला यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल. तसेच यासर्व गोष्टींसाठी तयारीही करावी लागेल. प्रवेश परीक्षा अभ्यास करायचा की बारावी परीक्षांचा अभ्यास? यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक कोणता निर्णय घेऊन स्पष्टता आणणं गरजेचे आहे. त्यामुळे आता बारावी परीक्षांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Board Exams 2021 : दहावीच्या परीक्षा रद्द, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार?
- Maharashtra Board Exams 2021: राज्यात एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI