नवी दिल्ली : अॅलोपॅथिक सायन्स कोरोना काळात कसं अयशस्वी झालं, त्यामुळे कसे मृत्यू झाले हे सांगत बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्सवर टीका केली होती. आता बाबा रामदेव यांनी आपण कोरोनाची लस घेणार असल्याचं सांगितलं आहे. सोबतच सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी असंही आवाहन केलं आहे. त्याचवेळी लोकांनी आयुर्वेद आणि योगाचा अभ्यास करावा असंही त्यांनी सांगितलं आहे. 


डॉक्टर हे देवाचे दूत
काही दिवसांपूर्वी डॉक्टरांवर टीका करणाऱ्या बाबा रामदेव यांना आता उपरती झाली आहे. ते म्हणाले की, "आमचे कोणत्याही संघटनेशी शत्रूत्व नाही. सर्व चांगले डॉक्टर म्हणजे या पृथ्वीवर पाठवलेले देवाचे दूत आहेत. आमचा लढा हा कोणत्याही डॉक्टरांच्या विरोधात नाही तर औषधं माफियांच्या विरोधात आहे."


काही दिवसांपूर्वी अॅलोपॅथीवर टीका करणारे बाबा रामदेव म्हणाले की, "औषधांच्या नावाखाली कोणाची फसवणूक होऊ नये आणि लोकांना अनावश्यक औषधं देण्यात येऊ नयेत. यामध्ये कोणताही संशय नाही की सर्जरी आणि आपत्कालीन स्थितीमध्ये अॅलोपॅथी हे सर्वात चांगले आहे."


काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये बाबा रामदेव हे अॅलोपॅथिक सायन्स विषयी अवमानजनक भाषा वापरताना दिसत आहेत. अॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे असं बाबा रामदेव बोलताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये त्यांनी अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही भाष्य केलं आहे.


आपल्या विधानावरुन वाद निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका स्पष्ट करताना बाबा रामदेव म्हणाले होते की, 'मी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांच्या विरोधात नाही. आयएमएच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ही लढाई तर, औषध माफियांच्या विरोधात आहे. जे दोन रुपयांचं औषध दोन हजार आणि केव्हा केव्हा तर 10 हजार रुपयांना विकतात. गरज नसतानाही शस्त्रक्रिया करतात.' 


वादग्रस्त कोरोनिल औषध
गेल्या वर्षी कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला होता. या औषधानं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबांनी केला होता. त्याला जागतिक आरोग्य संघटेनेने प्रमाणपत्र दिल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यावर पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याची बातमी खोटी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केलं होतं. तसंच या प्रकरणी आयएमएने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेही स्पष्टीकरण मागितलं होतं.


महत्वाच्या बातम्या :