मुंबई : विद्यापीठांसाठीच्या QS या जागतिक मानांकनांमध्ये 2022 मध्ये, भारतातील 3 विद्यापीठांनी पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले आहे. तर संशोधनाबाबत बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था जगात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. QS म्हणजे क्वाकारेली सायमंड्स ही संस्था जागतिक पातळीवर उच्चशिक्षण संस्थांचे विश्लेषण करते. या संस्थेने आज जगभरातील शैक्षणिक संस्थांसाठी अठरावी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मानांकने जाहीर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी ( भारतीय तंत्रज्ञान संस्था )-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बेंगळुरूचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं की, आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बंगळुरूचे हार्दिक अभिनंदन ! भारतातील अधिकाधिक विद्यापीठे व शिक्षणसंस्थांनी जागतिक गुणवत्तेच्या मापदंडां वर उत्कृष्ट ठरावे आणि तरुणाईतील बौद्धिक श्रीमंतीला पाठबळ द्यावे, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
विद्यापीठ मानांकनांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था-मुंबई (IIT-B) 177 व्या, दिल्ली-आयआयटी 185 व्या तर बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था 186 व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या संस्थांचे अभिनंदन केले आहे.
"शिक्षण आणि संशोधना च्या क्षेत्रांत भारत उत्तुंग भरारी घेत असून, तो आता जगद्गुरू होण्याच्या मार्गावर आहे" अशा शब्दात पोखरियाल यांनी समाधान व्यक्त केले. "विद्यार्थी, अध्यापकवर्ग आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधित अन्य भागीदारांचे सतत कल्याण चिंतणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा गुरु लाभल्याचा अभिमान वाटतो", अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शिक्षणसंस्थांना जागतिक क्रमवारीत स्थान मिळण्यात, राष्ट्रीय शिक्षण धोरण– 2020 आणि सर्वोत्तमता संस्थेसारख्या उपक्रमांचे योगदान मोठे आहे. QS आणि टाइम्स समूहाने घोषित केलेल्या मानांकनांवरून असाच निष्कर्ष निघत असल्याचेही ते म्हणाले.