Mumbai Rains : मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुबईला चांगलंच झोडपलं. मुंबईसह उपनगरांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पावसाच्या कोसळधारांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं, तसेच अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली होती. अशातच हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. 


मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेनं केलेल्या ट्वीटनुसार, "भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे. तसेच, पुढील चार दिवसांसाठी मुंबईत 'ऑरेंज अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी कृपया सतर्क राहावे व स्वतःची काळजी घ्यावी अशी विनंती"



दरम्यान, काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईसह उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. लालबाग, परळ, भायखळा, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले या ठिकाणी पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात मान्सूनने दमदार एन्ट्री केली. परंतु पहिल्याच पावसात मुंबईसह उपनगरात दाणादाण उडाली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान मुंबईसह, कोकण, पुणे आणि विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मान्सूनच्या पहिल्याच सरींनी लोकल सेवा ठप्प


बुधवारी (9 जून) पडलेल्या पहिल्याच मान्सून सरींमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता. साहजिकच याचा परिणाम हा सर्वप्रथम मुंबईच्या लाईफलाईनवर म्हणजेच मुंबई लोकलवर बघायला मिळाला. सतत पडलेल्या पावसामुळे ट्रॅकवरील पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर स्थगित ठेवण्यात आली होती. सोबत हार्बर मार्गावरील वाहतूक देखील स्थगित होती. मात्र, मुसळधार पाऊस पडूनही पश्चिम रेल्वेवरील वाहतूक स्थगित झाली नाही. 


बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक 214.44 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात 190.78 मिमी आणि शहर भागात 137.82 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरात विक्रोळी येथे सर्वात जास्त 285.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.


मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटिंग, जनजीवन विस्कळीत


चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी - 248.52 मिमी, घाटकोपर - 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Mumbai Rain Update : राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...