Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा मुस्लीम समाजाविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाबर आणि औरंगजेबांचा उल्लेख करत मुस्लीम समाजावर टीकास्त्र सोडलं आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
"बाबरसारख्या नालायक औलादींनी, औरंगजेबासारख्या क्रूर लोकांनी भारतात पाय ठेवले. असे दोन-चार लोक इथे आले आणि आज त्यांचं रूपांतर वीस कोटी लोकांमध्ये झालं, असे वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केले आहे. देशात परदेशी पैसा घेऊन ३ लाखांपेक्षा जास्त मदरसे बनवले, असेही त्यांनी म्हटले आहे.
सनातन संस्कृती महोत्सवात केवळ घोषणाबाजी करू नये. तुर्कस्तानला कोणताही दर्जा नाही. तरी ते ओरडत आहेत. सर्व मुस्लिम देश इस्लामचा प्रचार करत आहेत. त्यांनी परदेशी निधीतून ३ लाखांहून अधिक मदरसे कसे बांधले? त्यांच्यासाठी राष्ट्रवाद हा त्यांचा पहिला धर्म नाही. जर ते मदरसे आणि मशिदी बांधू शकतात तर आपण गुरुकुलही बांधू शकतो, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
बाबा रामदेव यांची पाकिस्तानवर टीका
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. दोन्ही देशांचे लष्कर अलर्टवर असून, या पार्श्वभूमीवर योगगुरू बाबा रामदेव यांनी पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबा रामदेव म्हणाले, “पाकिस्तान आधीच अंतर्गत संघर्षात गुरफटला आहे. अशा परिस्थितीत युद्ध झाले, तर पाकिस्तान भारतासमोर चार दिवसही टिकू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले. “लवकरच आम्ही कराचीमध्ये गुरुकुल स्थापन करू, त्यानंतर लाहोरमध्येही. पाकिस्तान स्वतःहून तुटून पडेल. बलुचिस्तानमधील लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. या प्रदेशातील परिस्थिती पाकव्याप्त काश्मीरपेक्षाही बिकट आहे. पाकिस्तानकडे भारताशी युद्ध करण्याची क्षमताच नाही,” असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या