India vs Pakistan: काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव टोकाच्या पातळीला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) करु शकतो किंवा दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते, अशा चर्चा सातत्याने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चीन (China) आणि तुर्कस्तान (Turkistan) हे दोन देश पाकिस्तानला रसद पुरवू शकतात, असे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच तुर्कस्तानच्या हवाईदलाची कार्गो विमाने दारुगोळ्याचा प्रचंड साठा घेऊन पाकिस्तानात उतरल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताचा इन्कार केला होता. परंतु, तुर्कस्तानच्या आणखी एका कृतीमुळे ते युद्धाच्या तयारीसाठी पाकिस्तानला (Pakistan Army) मदत करत असल्याचा संशय बळावला आहे. कारण तुर्कस्तानची एक युद्धनौका पाकिस्तानमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल झाल्याचे समजते. ही युद्धनौका अत्याधुनिक सामरिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तुर्कस्तानच्या या युद्धनौकेवर अँटी सबमरिन हेलिकॉप्टरसाठी डेक आणि अँटी शीप क्षेपणास्त्रे तैनात आहेत. तुर्कस्तानची ही युद्धनौका नेमकी आताच कराची बंदरात का दाखल झाली आहे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारताकडून कोणत्याही क्षणी एअर स्ट्राईक किंवा वॉटर स्ट्राईक होण्याची भीती पाकिस्तानी लष्कराला वाटत आहे. त्यामुळेच कराची हे प्रमुख बंदर सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तानने तुर्कस्तानची अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली युद्धनौका मदतीसाठी बोलावली असावी का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानमध्ये उतरलेल्या विमानांविषयी स्पष्टीकरण दिले होते. आम्ही पाकिस्तानला कोणताही दारुगोळा पाठवलेला नाही. आमचे विमान पाकिस्तानमध्ये केवळ इंधन भरण्यासाठी उतरले होते, असे तुर्कस्तानने सांगितले होते. त्यामुळे आता कराची बंदरात दाखल झालेल्या युद्धनौकेविषयी तुर्कस्तानकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे. मात्र, पडद्यामागून तुर्कस्तान पाकिस्तानला युद्धासाठी लागणाही रसद जमवण्यासाठी मदत तर करत नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता तुर्कस्तान यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, सध्या दिल्लीत महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे पुढे काय घडणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

पाकिस्तानच्या मदतीला पहिला देश मैदानात, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली