नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर उपाय शोधण्यासाठी संपूर्ण जगात धडपड सुरु आहे. अजूनही कुठलं ठोस उत्तर यावर मिळालेलं नाहीय. भारतात मोदी सरकारनं तर आता आयुर्वेदातही ती ताकद आहे का हे तपासण्यासाठी अभ्यास सुरु केलाय. अश्वगंधा ही आयुर्वेदिक वनस्पती कोरोना रोखण्यात किती प्रभावी ठरु शकते, यावर देशाचं आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय, आयसीएमआरनं क्लिनिकल स्टडी सुरु केलीय. याआधी हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधाची खूप चर्चा झाली. मात्र त्याबाबत अनेक मेडिकल तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली होती. आता अश्वगंधा किती परिणामकारक ठरतं याची चाचपणी सुरु आहे.


या अभ्यासाबाबत सरकारचं काय म्हणणं आहे?


अश्वगंधा ही औषधी गुण असलेली वनस्पती आहे. त्यात प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद असल्याचं काही अभ्यासातून समोर आलंय. आता कोरोनाशी लढण्यात याचा किती वापर होऊ शकतो हे आम्हाला तपासून पाहायचं आहे. 400 आरोग्यसेवकांवर या औषधाची चाचणी केली जाईल, यातल्या निम्म्या लोकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन तर निम्म्या लोकांना अश्वगंधा देऊन त्यांच्या प्रकृतीतले बदल पाहिले जातील.


साहजिकच हा तपास अत्यंत प्राथमिक पातळीवरचा आहे. पण किमान प्रोफिलॅक्टीक ट्रीटमेंट म्हणून ते कामी येतं का हे सरकारला तपासून पाहायचं आहे. म्हणजे लागण झाल्यानंतर नव्हे तर ती होऊ नये म्हणून हे औषध कामी येतं का हे चाचपायचं आहे.


हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाबाबत खूप चर्चा झाली. त्यानंतर ते औषध अमेरिकेनंही आपल्याकडून मागवलं. पण तिकडेही या औषधाबाबत अनेक हेल्थ एक्सपर्टनी शंका व्यक्त केली आहे. आता अश्वगंधा या आयुर्वेदिक हर्बची तपासणी सुरु आहे. तीन महिन्यांत हा अभ्यास पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष समोर येतील.


हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचे अनेक साईड इफेक्टही होतात. पण अश्वगंधामध्ये कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, असाही दावा केला जातोय. त्यामुळे आता जी आशा आधी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमध्ये दिसली होती, तशीच ती पुन्हा अश्वगंधात दिसणार का हे आपल्याला लवकरच कळेल.





Lockdown | राज्यात लाचखोरीचं प्रमाण घटलं, लॉकडाऊनच्या काळात फक्त 12 गुन्ह्यांची नोंद