Ayodhya Ram Mandir : अयोध्येतल्या (Ayodhya) राम मंदिराचं (Ram Mandir) काम नेमकं कुठपर्यंत आलं आहे? इतकी वर्षे निवडणुकीचा मुद्दा राहिलेलं हे मंदिर आता 2024 च्या निवडणुकीआधीच भाविकांसाठी खुलं होणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या अयोध्येतली लगबग पाहिली तरी तुम्हाला मंदिराच्या कामाचा वेग कळू शकेल. 


कुठपर्यंत आलंय राम मंदिराचं बांधकाम?


- सध्या राम मंदिराचं बांधकाम 40 ते 45 टक्के पूर्ण झालं आहे 
- पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत किमान गर्भगृहाचं काम पूर्ण होईलच
- 2024 च्या मकर संक्रांतीपासूनच गर्भगृहात रामलल्लांची प्रतिष्ठापना, भाविकांना दर्शनाची सोय खुली होण्याची शक्यता 
- मंदिर परिसराचं काम त्यानंतरही चालू राहील, जे 2025 च्या आसपास पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


लोकसभा निवडणुकीत यूपीचं महत्त्व सर्वाधिक


उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्यासाठी पुन्हा यूपीच्याच मार्गाने भाजपला जावं लागणार आहे. लोकसभेच्या 80 जागा असल्याने या राज्याचं महत्व सर्वाधिक आहे. त्यात राम मंदिर हा मुद्दा नाही ठरला तरच नवल. ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं भूमीपूजन केलं होतं, त्यावेळीच याची झलक मिळाली होती.


राम मंदिराचा मुद्दा संपणार की आणखी गाजणार? 


अयोध्येत सध्या एल अँड टी कंपनीचे 500 कामगार दिवसरात्र या मंदिराच्या कामात व्यस्त आहेत. दुसरीकडे मुख्य मंदिराच्या नक्षीदार खांबासाठी राजस्थानमध्येही एक युनिट व्यग्र आहे. संपूर्णपणे लोकांच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या फंडातून हे मंदिर साकारण्याचा ट्रस्टचा मनोदय आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त भरभरुन निधी लोकांनी भक्तीभावाने दिला आहे. आता फक्त पाहावं लागेल, की देशाच्या राजकारणात तीन दशकं गाजणाऱ्या या मंदिराचा मुद्दा या मंदिरनिर्मितीने संपतो की आणखी गाजत राहतो. 


प्राचीन बांधकाम शैलीचा वापर 


5 ऑगस्ट 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जाऊन राम मंदिराचं भूमिपूजन केलं. राम मंदिराच्या उभारणीसाठी 9 शिलांचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर 12 वाजून 44 वाजता चांदीच्या विटेने पाया घालण्यात आला. दरम्यान भारताच्या प्राचीन बांधकाम शैलीचा वापर करुन हे मंदिर उभारलं जाणार आहे, जेणेकरुन ते अधिक वर्षे मजबुतीने टिकेल. अयोध्येतल्या राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. हे मंदिर पुढची किमान हजार वर्षे भूकंप, वादळ यापासून सुरक्षित राहिल अशा पद्धतीने बनवण्याचा मानस असल्याचं मंदिर ट्रस्टने म्हटलं होतं.