मॉस्को : शांतता, स्थिरता आणि सुरक्षेसाठी विश्वासाचे वातावरण, गैर-आक्रमकता आणि एकमेकांबद्दल संवेदनशीलता महत्त्वाचे आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत बोलताना एकप्रकार चीनला इशारा दिला. भारत-चीनमध्ये तणावाचं वातावरण असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य आलं आहे. एकमेकांबद्दलची संवेदनशीलता आणि मतभेदांचे शांततेने निराकरण करण्याचे वातावरण, प्रादेशिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे महत्वपूर्ण आहेत, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.


दोन्ही देश आठ सदस्यीय प्रादेशिक गटाचा एक भाग आहेत, ज्यात प्रामुख्याने सुरक्षा आणि संरक्षण संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. राजनाथ सिंग यांनी आपल्या संबोधनात दुसर्‍या महायुद्धाचा उल्लेखही केला. ते म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी जगाला आजही शिकवतात. एका देशाने दुसर्‍या देशावर स्वारी करण्याच्या प्रकारामुळे सर्वांचा नाश होतो. चिनी संरक्षणमंत्री वेई फेंगहे यांच्या उपस्थितीत राजनाथ सिंह यांनी हे वकव्य केलं.


पुढे राजनाथ सिंह म्हणाले, एससीओ सदस्य देशांमध्ये 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राहते, तिथे शांततापूर्ण, स्थिर आणि सुरक्षित क्षेत्रासाठी विश्वास आक्रमकता नसणे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करणे, संवेदनशीलता आणि मतभेदांचं शांततेने निराकरण करणे आवश्यक आहे. दहशतवादी प्रचाराला सामोरे जाण्यासाठी आणि कट्टरपंथी वातावरण दूर करण्यासाठी दहशतवादविरोधी यंत्रणा स्वीकारणे हा मोठा निर्णय आहे. यंदाचं वर्ष दुसरे महायुद्ध संपण्याचं आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेचा 75 वा वर्धापन दिन आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.