Biporjoy Cyclone : बिपरजॉय (Biparjoy) हे यंदाच्या वर्षात अरबी समुद्रामध्ये आलेले पहिले चक्रीवादळ आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात 6 जून रोजी या चक्रीवादळाचा उगम झाला. त्यानंतर 18 जून रोजी हे वादळ शमणार होते. परंतु त्याआधीच म्हणजे 15 जून रोजी गुजरातच्या (Gujarat) किनारपट्टीला धडकले. गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ या भागांना या चक्रीवादळाचा फटका बसला. या चक्रीवादळाने जवळपास 13 दिवस आणि तीन तास अरबी समुद्रामध्ये प्रवास केला.
आतापर्यंतचे सर्वात मोठे चक्रीवादळ
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea) आतापर्यंत आलेल्या वादळांपैकी हे सर्वात जास्त कालावधीचे चक्रीवादळ आहे. दरम्यान आतापर्यंत अरबी समुद्रात आलेले चक्रीवादळ हे सरासरी सहा दिवस आणि तीन तासांच्या कालावधीचे होते. परंतु बिपरजॉय या चक्रीवादळाचे आयुष्य या सरासरीपेक्षा दुप्पट होते. अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान 8 ते 23 नोव्हेंबर 1977 मध्ये हिंदी महासागरामधील प्रदीर्घ कालावधीचे चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात विकसित झाले होते. त्यानंतर 14 दिवस आणि सहा तासांचा प्रवास करुन हे चक्रीवादळ अरबी समुद्रात शमले होते.
अलिकडच्या वर्षांमध्ये आलेल्या चक्रीवादळांपैकी ऑक्टोबर 2019 मध्ये आलेले कायर चक्रीवादळ हे नऊ दिवस आणि पंधरा तासांचा प्रवास करुन शमले होते. तर बंगालच्या उपसागरात नोव्हेंबर 2018 मध्ये आलेले गजा हे चक्रीवादळ नऊ दिवस आणि पंधरा तासांच्या कालावधीने शमले होते. बिपरजॉय या चक्रीवादळाने 2,525 किमी प्रवासात एकूण नऊ वेळा दिशा बदलली. त्यामुळे हवामानशास्त्रज्ञांना चक्रीवादळाच्या मार्गाचा अंदाज लावणे कठीण झाले होते. त्यानंतर 11 जून रोजी त्याचे रुपांतर अत्यंत तीव्र अशा चक्रीवादळात झाले. पंरतु चार दिवसानंतर या चक्रीवादळाचा जोर कमी झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय हे चक्रीवादळ 12 तासांच्या गताने पुढे सरकत होते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या चक्रावादळादरम्यान 6 आणि 7 जून रोजी या चक्रीवादळाचा वेग तीव्र होत गेला. त्यानंतर वातावरणात देखील बरेच बदल होऊ लागले. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीजवळीव विविध राज्यांमधील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर प्रशासनाकडून बचाव पथकांना देखील तैनात करण्यात आले होते.
'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कच्छ आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच तेथील घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळामुळं 23 जण जखमी झाले. तर राज्यातील किमान एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.