Assembly Election 2022 :  यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर झालं. या निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणा-या असणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षासाठी कुठल्या गोष्टी या निवडणुकीत पणाला लागलेल्या असतील याविषयी जाणून घेऊया. 


पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला ही निवडणूक म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जणू सेमीफायनलच आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची का? तर याचं सर्वात मोठं कारण आहे उत्तर प्रदेश.. दिल्लीतल्या सत्तेचा मार्ग लखनौमार्गे जातो असं म्हणतात...कारण 80 लोकसभा आणि 402 विधानसभा असलेलं हे राज्य राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरतं. 


ज्या पाच राज्यांत सध्या निवडणुका होत आहेत.  त्यापैकी चार  राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. यूपी, गोवा, उत्तराखंड, मणिपूर सगळीकडे भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ही पाच राज्यांची निवडणूक इतर कुठल्याही पक्षापेक्षा भाजपसाठी अधिक प्रतिष्ठेची आहे. भाजपला ही राज्यं आपल्याकडे ठेवण्यात यश येतं का याचं उत्तर देणारी ही निवडणूक असेल. 


 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हायला काँग्रेसला बळ मिळतं का हे पण याच निवडणुकीत ठरणार आहे. प्रियंका गांधी गेल्या दोन वर्षांपासून केवळ आणि केवळ उत्तर प्रदेशमध्येच मेहनत घेत आहेत. काँग्रेसचे मागच्यावेळी 402 पैकी अवघे 7 आमदार निवडून आले होते. त्या पार्श्वभूमीवर यूपीत यावेळी काँग्रेसला किती जागा मिळतायत यावर पक्षाची बरीच गणितं अवलंबून असणार आहे. 


 शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब गेल्या दोन वर्षात ढवळून निघाला आहे. मोदी सरकारवर अखेर कायदे मागे घेण्याची वेळ आली. त्यामुळे पंजाबमधला कौल कसा येतो यावरही बरंच काही अवलंबून असेल. याशिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आप, तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांनी आपापली विस्तार योजना सुरु केली आहे. पंजाब, उत्तराखंड गोव्यात आपनं ताकद लावली आहे. तर गोव्यात तृणमूलही लक्ष ठेवून आहे. या दोन पक्षांचं काय होतं यावरही 2024 च्या दृष्टीनं त्याची वाटचाल याच निवडणुकीत निश्चित होईल. 


राजकीय विश्लेषक, अभय देशपांडे आणि रविकिरण देशमुख सखोल विश्लेषण 



 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल


Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम; आधीचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार


ABP News C Voter Survey : कोरोना, मोदींचा चेहरा की योगींचं काम....निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार प्रभावी, पाहा काय म्हणतेय जनता