Election Commission Press Conference on Assembly Election : कोरोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना महासाथीत निवडणुका होाणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. 


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मोठ्या जाहीर सभांऐवजी, लहान सभा घेण्याचे निर्देश निवडणूक आयोग देऊ शकतो. 


कोविड प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले तरच या छोट्या रॅली काढता येतील. दोन्ही डोस लागू केलेल्या लोकांना मेळाव्यात घेण्याचे आवाहन पक्षांना करता येईल. त्याशिवाय, निवडणूक-मतदानाच्या कामात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चिंता निवडणूक आयोगाला आहे.


निवडणूक आयोग कोणते निर्बंध लागू करू शकतो?


कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अशा निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक आयोग नियुक्ती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याशिवाय लसीकरण पूर्ण केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.  मतदान केंद्रावर 1500 मतदारांऐवजी आता जास्तीत जास्त 1250 मतदारांनाच मतदान करता येणार आहे. एवढेच नाही तर उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त ५ जणांना सोबत घेता येणार आहे. त्याशिवाय घरोघरी प्रचारासाठी जास्तीत जास्त ५ जणांनाच परवानगी दिली जाऊ शकते.


नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर होणार?


निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसोबतच निवडणूक आयोग नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करू शकतो, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. एकदा जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे अंतिम असतील असे होणार नाही. निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांचे फेरबदल सुरूच राहणार आहेत.


पाच राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ कधी संपणार?


गोवा राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी, मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ १९ मार्च रोजी, उत्तराखंडचा कार्यकाळ २३ मार्च रोजी, पंजाब राज्याचा कार्यकाळ  २७ मार्च रोजी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ  १४ मे रोजी संपणार आहे.