गुवाहाटी : आसामच्या मुख्यमंत्री पदासाठी हेमंत बिस्वा सरमा यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी 11 वाजता भाजपच्या निर्वाचित सदस्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता एनडीएची बैठक होणार आहे. त्यावेळी हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनावल आणि हेमंत बिस्वा सरमा यांना दिल्लीमध्ये बोलवलं होतं. यावेळी या दोन नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर हेमंत बिस्वा सरमा हेच आसामचे नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु झाली.
आसाममध्ये भाजपने पूर्ण बहुमत मिळवून आपली सत्ता राखली आहे. आज दुपारी गुवाहाटी येथे एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे महासचिव अरुण सिंह हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी भाजपचे आसाम प्रभारी वैजयंत पांडा हे देखील उपस्थित राहणार आहेत.
आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपने आपली सत्ता राखली आहे. भाजपने 126 विधानसभा जागांपैकी 60 जागांवर विजय मिळवला असून भाजपचे सहयोगी पक्ष आसाम गण परिषदने नऊ तर पिपल्स पार्टी लिबरलने सहा जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या आधी भाजपने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता.
हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या रोमेन चंद्र बोरठाकुर यांचा 1,01,911 मतांनी पराभव केला आणि जालुकबारी या मतदारसंघात विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या :
- कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोविड रिपोर्ट नको; रुग्णांची अडवणूक करता येणार नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश
- लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतर, कच्च्या मालाचा पुरवठा आवश्यक; Bharat Biotech च्या सह-सस्थापिका सुचित्रा इला यांचं मत
- Long March 5B : अवकाशात भरकटलेलं चीननं रॉकेट आज कोणत्याही क्षणी पृथ्वीवर 'या' भागात धडकणार