Assam Floods 2022 : आसासमध्ये पुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. पुराने हाहाकार माजला असून, तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 27 जिल्ह्यातील, जवळपास 6 लाखांहून अधिक लोकांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. 48 हजारांहून अधिक लोकांना 248 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. होजई आणि कचरला या जिल्ह्यांना सर्वाधिक पुराचा तडाखा बसला आहे.


मदत मोहिमेअंतर्गत होजई जिल्ह्यातील 2 हजारांहून अधिक लोकांना लष्कराने सुरक्षितस्थळी हलवले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे राज्याच्या इतर भागातून संपर्क तुटल्यानंतर बराक खोऱ्यात अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी आसाम सरकारचे प्रादेशिक एअरलाइन फ्लायबिग एअरलाइनच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली. 


पुराच्या संदर्भातील महत्वाचे मुद्दे


1) मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, सिलचर आणि गुवाहाटी दरम्यान 3,000 रुपये प्रति तिकीट दराने विशेष उड्डाणे चालवण्यासाठी एअरलाइनशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.


2)  पुढील 10 दिवस ही उड्डाणे चालवण्यात येतील. आम्हाला आशा आहे की 70 ते 100 अडकलेल्या प्रवाशांनी दररोज या सेवेचा लाभ घ्यावा. विमान कंपनीला सबसिडीच्या रुपात अतिरिक्त खर्च सरकार उचलणार आहे.


3) आसाममधील पूरग्रस्त भागात अडकलेल्या गुवाहाटी एक्स्प्रेस आणि गुवाहाटी-सिलचर एक्स्प्रेस गाड्यांमधील 1 हजारहून अधिक प्रवाशांचे मोबाइल नेटवर्क पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे स्थानकावर रेलटेलच्या वाय-फाय सुविधेद्वारे मदत करण्यात आली आहे.


4) गेल्या आठवड्यात आसाममधील लमडिंग-बदरपूर पर्वतीय विभागात अडकलेल्या दोन गाड्यांमधील प्रवाशांना स्टेशन वाय-फाय वापरुन दळणवळण देण्यासाठी रेलटेलने विशेष व्यवस्था केली आहे. कारण मुसळधार पावसामुळे बाधित भागातील सर्व ऑपरेटर्सची मोबाइल सेवा ठप्प झाली होती, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.


5) बाधित क्षेत्र ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या लुमडिंग रेल्वे विभागांतर्गत येते. या विशेष व्यवस्थेचा वापर करुन प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधता आला. मदत आणि बचाव कार्य प्रभावीपणे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या कनेक्टिव्हिटीचा वापर केला आहे.


6) खराब हवामान आणि संततधार पावसामुळे लामडिंग-बदरपूर पर्वतीय विभागात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचले आहे. यामुळे डोंगराळ भागातील रेल्वे ट्रॅक, पूल, रस्त्यांचे मोठं नुकसान झाले आहे.


7) ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, 7-NFR झोनने बाधित विभागासाठी पूर्ण तयारी केली होती. मात्र, दोन गाड्या, प्रत्येकी सुमारे 1 हजार 400 प्रवासी वाहून नेणाऱ्या या महापुरात अडकल्या. एक ट्रेन सिलचर-गुवाहाटी एक्स्प्रेस होती जी डितकछा स्टेशनवर थांबली. दुसरी गुवाहाटी-सिलचर एक्स्प्रेस आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यातील न्यू हाफलांग स्टेशनवर होती.


8) रेल्वे प्रशासनाने हवाई दल, रेल्वे संरक्षण दल (RPF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), आसाम रायफल्स आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरु केले. बाधित भागातील सर्व ऑपरेटर्सची मोबाईल सेवा ठप्प झाल्याने परिस्थिती अधिक बिकट बनली आहे.


9)  रेलटेल कॉर्पोरेशनने रेल्वे स्थानकावर आधीच उपलब्ध केलेली वाय-फाय सुविधा कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात खूप उपयुक्त ठरली. प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी स्टेशन वाय-फाय वापरण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.


10)  लष्कराकडून लोकांना मदत करण्याचे काम सुरु आहे.  त्यांना आवश्यक साहित्याचे वाटप केले जात आहे.