मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील एक असणारे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची संपत्ती म्हणजे डोळे दिपवणारी. मोठमोठ्या सर्व क्षेत्रात अंबानी घराणं सक्रिय आहे. त्यामुळेच अंबानी भारतातील एक श्रीमंत घराणं आहे, यात शंका नाही. सध्याच्या माहितीनुसार 208 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असणारे मुकेश अंबानी आता पुढील पिढीकडे सर्व कारभार सोपवण्याबाबत विचार करत आहेत. पण याआधी मुकेश आणि त्यांचा भाऊ अनिल (Anil Ambani) यांच्यात संपत्ती वाटपावरुन बरेच वाद झाल्याने आता मुकेश यांना त्यांच्या मुलांमध्ये संपत्ती वाटताना योग्य नियोजन अत्यंत गरजेचं आहे. यासाठी ते एक खास प्लॅन करणार आहेत.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉल्टन परिवाराने (Walton Family) ज्याप्रकारे त्यांच्या संपत्तीचं पुढील पिढीकडे वाटप केलं होतं तोच प्लॅन (succession model) अंबानी वापरु इच्छित असल्याचं समोर येत आहे. अंबानी यांनी त्यांच्या संपत्तीचं पुढील पिढीत वाटप करण्यासाठी जगातील अनेक अरबोपती कुटुंबाचा प्लॅन पाहिला. यातील अमेरिकेची दिग्गज रिटेल कंपनी वॉलमार्ट इंक (Walmart Inc) असणाऱ्या वॉल्टन कुटुंबांचा (Walton family) प्लॅन त्यांना सर्वाधिक आवडला आहे. वॉल्टन कुटुंबातील तीन सदस्य हे जगातील टॉप 20 श्रीमंतामध्ये गणले जातात.
कोण आहे वॉल्टन कुटुंब?
वॉल्टन कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब असून त्यांचा वार्षिक महसूल कोट्यवधींच्या घरात आहे. जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट त्यांचीच असल्याने त्यांचं उत्पन्न अरबोंमध्ये आहे. वॉलमार्ट कंपनीची स्थापना 1962 मध्ये सॅम वॉल्टन (Sam Walton) यांनी केली होती. जानेवारी 2021 मध्ये या कंपनीचा रेवेन्यू अर्थात महसूल 559 अब्ज डॉलर इतका असून या कंपनीचे जगात 11 हजार 510 रिटेल स्टोर आहेत.
असं केलं होतं वॉल्टन यांनी नियोजन
वॉल्टन कुटुबाचे मुखिया आणि कंपनीचे संस्थापक सॅम वॉल्टन (Sam Walton) यांचा 1992 मध्ये मृत्यू झाला. पण त्यापूर्वीच त्यांनी सर्व कामकाजाचं नियोजन केलं होतं. त्यांनी 1988 पासून मॅनेजरकडे दिवसभराचं कामकाज सोपवून या सर्वावर नजर ठेवण्यासाठी एका बोर्डाची स्थापना केली. यामध्ये सॅमचा सर्वात मोठा मुलगा रॉब वॉल्टन आणि भाचा स्टुवर्ट वॉल्टन यांचा समावेश आहे. दरम्यान अशीच काहीसं नियोजन करुन अंबानीही त्यांच्या उत्तरार्धात संपत्तीचं नियोजन करु इच्छित आहेत.
असं असू शकतं अंबानीचं नियोजन
मुकेश अंबानी यांनी सॅम वॉल्टन यांच्याप्रमाणे संपत्तीचं वाटप केलं तर ते त्यांची दोन मुले, मुलगी आणि पत्नीमध्ये संपत्तीचं वाटप करु शकतात. मुकेश अंबानी वॉल्टन कुटुंबाप्रमाणे मालमत्तेचे व्यवस्थापन करून त्याचे एका ट्रस्टसारख्या संस्थेत रुपांतर करुन त्यावर नजर ठेवण्यासाठी एका बोर्डाची स्थापना करु शकतात. पण अजूनपर्यंत याबाबत कोणतीचं अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वॉल्टनची नेटवर्थ अंबानीपेक्षा 2.5 पट अधिक
सॅम यांनी मृत्यूच्या 40 वर्षांपूर्वी 1953 मध्ये उत्तराधिकाराची योजना तयार केली होती. त्यांनी कौटुंबिक व्यवसायातील 80 टक्के भाग त्यांच्या 4 मुलांमध्ये एलिस, रॉब, जिम आणि जॉन यांच्यात वाटला. सद्यस्थितीला त्यांची एकूण नेटवर्थ 227.6 अब्ज डॉलर इतकी आहे. Bloomberg Billionaires Index या कंपनीच्या मते अंबानींची नेटवर्थ 89.7 अब्ज डॉलर असल्याने वॉल्टन यांची नेटवर्थ अंबानीच्या तुलनेत अडीच पट आहे.
संबंधित बातम्या :
- अदानींची अंबानींना धोबीपछाड! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
- Hurun India : सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत, अदानींच्या संपत्तीत रोज 1002 कोटींची भर
- Forbes List : कोरोना काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ, मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha