नवी दिल्ली : आठवड्याभरात दोन रेल्वे अपघात झाल्याने रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


अश्वनी लोहानी रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्सच्या (IRSME) 1980 च्या बॅचचे अधिकारी आहेत. लोहानी यांच्याकडे रेल्वेमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे.

अश्वनी लोहानी यांनी याआधी उत्तर रेल्वेमध्ये चीफ मेकॅनिकल इंजिनिअर, दिल्लीमध्ये डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, दिल्लीमध्येच रेल्वे म्युझियममध्ये संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.

एअर इंडियाचे सीएमडी पदावर रुजू होण्याआधी अश्वनी लोहानी हे मध्ये प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते.

अश्वनी लोहानी यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद झालंय. त्यांच्याकडे इंजिनिअरिंगच्या चार पदव्या आहेत, ज्यासाठी त्यांचं नाव 2007 साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं होतं.