कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता तिथले राजकीय वातावरणही तापल्याचं पहायला मिळतंय. माजी क्रिकेटपट्टू आणि पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरच्या मोयना विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अशोक दिंडा यांच्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला आहे. अशोक दिंडा यांनी एका निवडणूक प्रचारसभेत भाग घेतला होता. त्यावेळ तृणमूल समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय.


पीटीआयच्या वृत्तानुसार, अशोक दिंडा यांच्या गाडीवर पन्नासहून जास्त लोकांनी हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान करण्यात आलं आहे. तसेच भाजप उमेदवार अशोक दिंडा यांच्या खांद्याला आणि पाठीलाही जबर मार लागला आहे. आपल्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनीच हल्ला केल्याचा आरोप अशोक दिंडा यांनी केला आहे. या घटनेची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून जिल्हा प्रशासनाकडून त्यांनी या घटनेचा अहवालही मागवला आहे.


अशोक दिंडा यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं की, अशोक दिंडा हे मोयना एक रोड शो करुन मोयना बाजारमध्ये आल्यानंतर तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता शाहजहा अली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काठ्या, सुऱ्या आणि विटांच्या सहाय्याने अशोक दिंडा यांच्या गाडीवर हल्ला केला. अशोक दिंडा यांनी केलेल्या या आरोपाचे तृणमूल काँग्रेसकडून खंडण करण्यात आले असून हा भाजपचा अंतर्गत वाद असल्याची टिप्पणी केली आहे. 


दुसऱ्या टप्प्यासाठी गुरूवारी मतदान
पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 30 विधानसभेच्या जागांसाठी गुरूवारी मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 171 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. या 171 उमेदवारांत 19 उमेदवार या महिला आहेत. भाजपने आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने या 30 ही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर सीपीएमने 15, काँग्रेसने 9, सीपाआयने 2 आणि इतर घटक पक्षांनी 2 उमेदवार उभे केले आहेत. 


या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्रामच्या मतदारसंघाचा समावेश आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दू अधिकारी निवडणूक लढवत आहेत. 


महत्वाच्या बातम्या :