नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना थांबवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर रात्री 11 ते पहाटे 5 च्या दरम्यान तुम्हाला रेल्वेतील मोबाईल चार्जिंग पोर्टचा वापर करता येणार नाही. त्याला जोडणारी वीज या वेळेत बंद करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे आता रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत.
पश्चिम विभागाने केली सुरुवात
रेल्वेच्या या निर्णयाची माहिती मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या आधी पश्चिम विभागाच्या रेल्वेने 16 मार्चपासून रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेल्वेत चार्जिंग पोर्टसाठीची वीज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी पीटीआयला सांगितलं की, रेल्वे बोर्डने अशा प्रकारचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत. पश्चिम विभागाने याची अंमलबजावणी 16 मार्चपासून सुरू केली आहे.
या आधीही केली होती शिफारस
रेल्वेमध्ये लागणाऱ्या आगी थांबवण्यासाठी रेल्वे बोर्डने काही महत्वाचे निर्णय या आधीच घेतले आहेत. दक्षिण विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बी गुगनेसन यांनी पीटीआयला सांगितलं की, रेल्वे बोर्डने घेतलेला हा निर्णय काही नवीन नाही. या आधीच घेतलेल्या निर्णयाची फक्त आता अंमलबजावणी करण्यात येत आहे. 2014 साली बंगळुरु-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसमध्ये आगीची घटना घडली होती. त्यावेळी रेल्वे बोर्डच्या सुरक्षा आयुक्तांनी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेल्वेतील मोबाईल चार्जिंग पोर्ट बंद ठेवावे अशी शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी आता होत असून रेल्वे बोर्डने आता सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस, अन्यथा तुमचे Pan Card होणार बंद
- Ramnath Kovind Health | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर AIIMSमध्ये यशस्वी बायपास शस्त्रक्रिया
- West Bengal elections | वाघांच्या हल्ल्यामुळे तीन हजार महिला विधवा; त्यांच्या नजरेतून पश्चिम बंगालची निवडणूक...