नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहा मंत्रीदेखील शपथ घेणार आहेत. या सहा मंत्र्यांमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे. 16 फेब्रुवारी म्हणजे आज रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा सुरु होईल, तर 12.15 वाजता अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रपदाची शपथ घेतील.
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केलं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रणाचं पत्र पाठवलं आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वाराणसी येथे असणार आहेत. 'आप'च्या गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सर्व सात खासदारांना आणि भाजपच्या आठ नवनिर्वाचित आमदारांना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
Big Announcement: अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीला येणार बेबी 'मफरलरमॅन
Delhi Election Result 2020 | 'दिल्ली' विजयानंतर आपची पहिली बैठक, विधिमंडळ नेत्याची होणार निवड
दिल्ली विधानसभेवर 'आप'ची एकहाती सत्ता
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आपने 70 पैकी 62 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपने उर्वरित 8 जागा ताब्यात घेतल्या, तर दिल्लीवर 25 वर्ष सत्ता गाजवलेल्या काँग्रेसला निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. आपच्या मागील वेळेपेक्षा चार जागा कमी झाल्यात. तर, भाजपच्या चारने वाढल्या आहेत. मात्र, काँग्रेस सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरली आहे.