नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी अरविंद केजरीवाल यांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला दिल्लीकरांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली. यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती.


दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आम आदमी पक्षाने तिसऱ्यांना दिल्लीत सत्ता स्थापन केली आणि अरविंद केजरीवाल तिसऱ्यांना मुख्यमंत्री बनले. अरविंद केजरीवाल यांनी 2013 साली पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 2015 मध्ये केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री बनले होते. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांनीही मंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.


Delhi Election Result | CAA-NRC विरोधी मोर्चे, निदर्शनं निघालेल्या मतदारसंघात काय झालं?



मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा विजय फक्त माझा नाही तर हा प्रत्येक दिल्लीकराचा विजय आहे. दिल्लीतल्या प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे. दिल्लीतील नागरिकांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी आम्ही गेली पाच वर्ष प्रयत्न केले. पुढील पाच वर्षातही आमचा हा प्रयत्न असेल. सर्वांना आपल्या गावात फोन करुन सांगून टाका, तुमचा मुलगा मुख्यमंत्री बनला आहे, आता चिंता करण्याची गरज नाही.


गेल्या पाच वर्षात मी सर्वांसाठी काम केलं, कुणालाही वेगळी वागणूक दिली नाही. सर्वपक्षीयांसाठी मी काम केलं. आत निवडणूक संपली आहे, तुम्ही कुणालाही मतदान केलं असेल, मात्र आता दिल्लीतील दोन कोटी लोक माझं कुटुंब आहे. कोणंतही काम सांगा सगळ्यांचा मी काम करेन. अजून दिल्लीसाठी अनेक मोठ-मोठी काम करायची आहेत, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.




दिल्ली विधानसभेवर 'आप'ची एकहाती सत्ता


दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आपने 70 पैकी 62 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपने उर्वरित 8 जागा ताब्यात घेतल्या, तर दिल्लीवर 25 वर्ष सत्ता गाजवलेल्या काँग्रेसला निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. आपच्या मागील वेळेपेक्षा चार जागा कमी झाल्यात. तर, भाजपच्या चारने वाढल्या आहेत. मात्र, काँग्रेस सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरली आहे.