मुंबई : सीएएविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शाहीनबागमधील आंदोलक अखेर उद्या अमित शाहांना भेटणार आहेत. पायी मोर्चा काढत आंदोलक गृह मंत्रालयापर्यंत जाणार आहे.सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात शाहीन बागमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.


अमित शाह यांची भेट घेण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही रितसर विनंती अर्ज मिळालेला नाही असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. दुपारी दोन वाजता या मोर्चाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शाहीन बाग मधील आंदोलक म्हणतात की, ते पदयात्रा काढून गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी जाणार आहे. काल रात्री 3 वाजता हा निर्णय घेण्यात आला. हा मोर्चा जसोला मथुरा रोड मार्गे गृह मंत्रालयाकडे जाईल. याबाबत पोलिसांची परवानगी घेण्यात आलेली नाही. आंदोलकांचे म्हणणे आहे की, त्यांना सरकारने बोलावले आहे तेव्हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे जबाबदारी सरकारची आहे.


बैठकीसंदर्भात गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, या बैठकीसंदर्भात अद्याप कोणत्याही आंदोलकांनी अमित शहा यांच्याशी संपर्क साधलेला नाही. तसेच अमित शाह यांची भेट घेण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही रितसर विनंती अर्ज मिळालेला नाही.

दिल्ली पोलिस म्हणतात की, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासंदर्भात आम्हाला उद्या शाहीन बागेतील आंदोलकांकडून कोणताही संदेश मिळाला नाही. केवळ माध्यमांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत बातम्या आल्या आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु अद्यापपर्यंत शाहिनबाग पीपल कमिटीचा कोणताही कार्यक्रम स्पष्ट कऱण्यात आलेला नाही. तसेच गृहमंत्रालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शाहीन बागेतील आंदोलनावेळी आसिफ तूफानी नावाच्या आदोलकांनी जाहीर केले की, 'आम्ही अमित शहा यांना भेटायला तयार आहोत आणि आम्ही अमित शहा यांच्याकडे ज्येष्ठ महिलांसोबत भेटायला जाणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने जोरात आवाज उठविला आणि आम आदमी पार्टी हे टाळत असल्याचे दिसून आले.